बाळसई येथे शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा

बाळसई येथे शिवजयंती उत्सव अतिशय उत्साहात साजरा
दिनेश ठमके
सुकेळी : बाळसई ( ता.रोहा) येथे बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५ रोजी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आदर्श कल्याणकारी राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती अतिशय उत्साह व जल्लोषमय वातावरणात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता रायगडहुन बाळसई येथे शिवज्योतीचे आगमन झाले. त्यानंतर बाळसई गावचे अध्यक्ष मधुकर ठमके व सर्व बाळसई ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये रुद्राभिषेक, ध्वजारोहण व शिवप्रतिमेचे पुजन करुन शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. दुपारी खास महिलांसाठी हळदीकुंकूच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शविला होता. त्यानंतर संपूर्ण बाळसई गावातुन भव्य मिरवणूक सोहोळा पार पडला. यावेळी ढोल – ताशांच्या गजरात सर्वच तरुण – तरुणी नाचण्यात दंग झाले होते. जय भवानी – जय शिवाजी, छत्रपति शिवाजी महाराज की जय या घोषणांनी संपुर्ण बाळसई गाव दणानुन जात संपूर्ण गावामध्ये भगवेमय वातावरण पसरले होते. अनेक लहान मुलांनी शिवरायांच्या तसेच लहान मुलींनी जिजाबाईंच्या वेशभूषा साकारत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे यावेळी तरुण वर्गाकडून मर्दानी खेळ देखिल खेळण्यात आले.
रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मिरवणूक सोहोळा शिवस्मारकाजवळ आल्यावर श्री.छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेतल्यानंतर उपस्थित शिवभक्तांना स्नेहभोजन देण्यात आले. शेवटी सद्यपरिस्थितीत सर्वच चित्रपटगृहात गाजत असलेल्या ” छावा ” हा चित्रपट पडद्यावर दाखविण्यात आला. यावेळी सर्वच ग्रामस्थांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. आई बेलजाई मित्र मंडळ बाळसई – मुंबई, शिवप्रतिष्ठान बाळसई, ग्रामस्थ व महिला मंडळ बाळसई यांनी मेहनत घेतली.