महाराष्ट्र ग्रामीण
जिंदालच्या कंपन्यांची फेर मोजणी करण्यासाठी ऐनघरच्या माजी सरपंचांकडून पाठविलेले पत्र आजी सरपंचाकडून रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार
रोहा पंचायत समितीचे अधिकारी मोजणी न करताच गेले परत

जिंदालच्या कंपन्यांची फेर मोजणी करण्यासाठी ऐनघरच्या माजी सरपंचांकडून पाठविलेले पत्र आजी सरपंचाकडून रद्द करण्यासाठी पत्रव्यवहार
रोहा पंचायत समितीचे अधिकारी मोजणी न करताच गेले परत
ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांमध्ये उलटसुलट चर्चा
माजी सरपंच अर्चना भोसले याप्रकरणी दाद मागणार
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याजवळील ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या जिंदाल समूहाच्या कंपन्यांमधील बांधकामाची व इतर जागेची फेरमोजणी करण्यासाठी माजी सरपंच अर्चना भोसले यांनी रोहा पंचायत समितीकडे पाठविलेले पत्र रद्द करण्यात यावे यासाठी विद्यमान सरपंच कलावती कोकळे यांनी रोहा पंचायत समितीकडे १० फेब्रुवारी रोजी नव्याने पत्रव्यवहार केल्याने ऐनघर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांतून उलट सुलट चर्चा होत आहे. दरम्यान यासंदर्भात आपण वरिष्ठ कार्यालयात दाद मागणार असल्याचे माजी सरपंच अर्चना भोसले यांनी सांगितले.

नागोठणे विभागातच नव्हे तर संपूर्ण रोहा तालुक्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमी चर्चेत राहत असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीच्या या प्रकरणात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील जिंदाल समूहाच्या कंपन्यांची सुमारे सात कोटी रुपयांची घरपट्टी कर थकीत आहे. याशिवाय या कंपन्यांच्या होणाऱ्या फेरमोजणी मधून कंपनीमध्ये नव्याने झालेल्या बांधकामाचा, कंपनीच्या हद्दीचा तसेच कंपनीकडून बेकायदेशीरपणे केला जाणाऱ्या जमिनीच्या वापराचा तपास केला जाणार होता. या फेर मोजणीद्वारे कंपनीकडून दरवर्षी आकारला जाणाऱ्या घरपट्टी करामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढ होणे अपेक्षित होते. असे असतांनाच ही मोजणी प्रक्रिया थांबवण्याचे नक्की कारण काय ? असा प्रश्न माजी सरपंच अर्चना भोसले व स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात असून कंपनीशी असलेले हितसंबंध जोपासण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावांचा विकास थांबविणार काय ? तसेच या संशयास्पद घडामोडींची चौकशी होणार काय ? असेही स्थानिक नागरिकांतून विचारले जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रोहा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना १० डिसेंबर, २०२४ मध्ये पाठविलेल्या लेखी आदेशानुसार तसेच रोहा पंचायत समितीच्या ३१ डिसेंबर, २०२४ च्या कार्यालयीन पत्रानुसार पाच जणांच्या कर निर्धारण समिती मधील तिघेजण रोहा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. एन. गायकवाड, शाखा अभियंता अमित चिपळूणकर व ग्रामविकास अधिकारी गोविंद शिद यांनी पाईप नगर, सुकेळी येथील महाराष्ट्र सिमलेस लि. या कंपनीच्या मिळकतीची संयुक्तिक फेरमोजणीची कार्यवाही करण्यासाठी दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५ रोजी कंपनी परिसरात भेट दिली असता कर निर्धारण समितीचे अध्यक्ष असलेल्या ऐनघर सरपंच व उपाध्यक्ष असलेले उपसरपंच उपस्थित न राहिल्याने फेर मोजणीची कार्यवाही
पूर्ण करता आली नसल्याचा शेरा रोहा पंचायत समितीमधून फेर मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे मासिक सभेत हा विषय घेऊन याप्रकरणी कोणतीही चर्चा न करता तसेच ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर पाठविलेल्या या पत्रावर ग्रामविकास अधिकाऱ्यांची सही न घेता केवळ सरपंचांच्या सहीचे पत्र रोहा पंचायत समितीकडे पाठवून ही फेरमोजणी रद्द करण्याचे नक्की कारण काय ? असा प्रश्न माजी सरपंच अर्चना भोसले यांनी उपस्थित केला आहे.
“या संदर्भात ऐनघर ग्रामपंचायतीच सरपंच कलावती कोकळे यांनी सांगितले की, मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक २१ जानेवारी, २०२५ च्या आदेशान्वये माजी सरपंच अर्चना भोसले यांना सरपंच पदासाठी अपात्र ठरविले. त्यानंतर सरपंच पद माझ्याकडे आल्याने ऐनघर ग्रामपंचायत हद्दीतील कंपन्यांची फेर मोजणी करण्याविषयी नव्याने ठराव करण्यात येईल व तसे रोहा पंचायत समितीला कळविण्यात येईल त्यासाठी ही फेर मोजणी थांबविण्याची विनंती करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.”
“तसेच या संदर्भात ऐनघर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गोविंद शिद यांच्याशी संपर्क साधला असता फेरमोजणीची प्रक्रिया रद्द करण्याविषयी रोहा पंचायत समितीकडे केलेल्या पत्रव्यवहारा संबंधी मला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.“