महाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायणाचे आयोजन
नागोठणे नगरीत दुमदुमणार श्री हरीनामाचा गजर

नागोठण्यात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायणाचे आयोजन
नागोठणे नगरीत दुमदुमणार श्री हरीनामाचा गजर
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील श्री संत सेवा मंडळाच्या वतीने येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरात रविवार दि. २ मार्च ते बुधवार दि.५ मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण होणार आहे. या सोहळ्याचे नियोजनबद्ध आयोजन श्री संत सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी २ ते ४.३० या दरम्यान ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे पारायण होणार आहे. सायं. ५ ते ६ या वेळेत प्रवचन, सायं. ६ ते ७.३० वाजेपर्यंत हरिपाठ तर रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तन यानंतर भजन व जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे.
या सोहळ्याची सुरुवात रविवारी (दि.२) सायं. गुरुवर्य ह.भ.प.दिनेश महाराज कडव(वांदोळी) यांच्या प्रवचनाने होणार आहे. रात्री ह. भ. प. नित्यानंद महाराज मांडवकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. सोमवारी (दि.३) ह. भ. प. विठोबा महाराज मांडलुस्कर (वणी) यांचे प्रवचन तर ह. भ. प. किरण महाराज कुंभार (धोंडसे – पाली) यांचे कीर्तन होणार असून मंगळवारी (दि.४) ह.भ.प. विजय महाराज शहासने यांचे प्रवचन तर ह.भ.प. तुकाराम महाराज शिंदे (श्री क्षेत्र देवाची आळंदी) यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. याचबरोबर बुधवार दि.५ मार्च रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वाजेपर्यंत श्री क्षेत्र पंढरपूर येथील मठाधिपती, गुरुवर्य ह.भ.प. नारायणदादा वाजे महाराज यांचे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता पटांगणात काल्याचे किर्तन होणार आहे. यानंतर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याच्या निमित्ताने श्री हरीनाम गजरात दिंडी सोहळा संपन्न होणार असून यानंतर आलेल्या सर्व भाविकांना, ग्रामस्थांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद झाल्यानंतर या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता होणार आहे.