ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यशवंत हळदे यांचे निधन

ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यशवंत हळदे यांचे निधन
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा ऐनघर विभाग कुणबी समाजाचे अध्यक्ष, तामसोली गावातील अभ्यासु व्यक्तीमत्व असलेले यशवंत नारायण हळदे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी आकस्मित निधन झाले. त्यांच्यावर शुक्रवार दि. १४ रोजी रात्री उशिरा तामसोली स्मशानभुमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अशा अचानक जाण्याने ऐनघर विभागासह संपूर्ण रोहा तालुक्यात दुःख:चे सावट पसरले आहे.
कै.यशवंत हळदे यांचा अल्पपरीचय द्यायचा झाला तर अतिशय हुशार व्यक्तीमत्व, राजकारण व समाजकार्यामध्ये देखिल त्यांचा अतिशय मोलाचा वाटा होता. येथील जिंदाल समूहाच्या महालक्ष्मी सिमलेस या कारखान्यात त्यांनी महत्वाच्या पदावर काही काळ नोकरीही केली होती. नेहमीच तरुण वर्गाला देखिल त्यांचे चांगल्या प्रकारे सहकार्य असायचे. नागोठणे विभागातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, तसेच ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व ऐनघर विभाग कुणबी समाजाचे अध्यक्ष अशी त्यांची खास ओळख होती. तसेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात अनेक पदांवरही चांगल्या प्रकारे काम केले आहे. ते खा. सुनिलजी तटकरे यांचे खास समर्थक मानले जायचे.
गुरुवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी गावाच्या बाहेर गेले असता त्या ठिकाणी ते चक्कर येऊन रस्त्यावरतीच पडले. त्यांना तात्काळ नागोठणे येथिल कोकणचे हाॅस्पिटल तसेच रोहा येथिल अशोक जाधव रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तोपर्यंत हळदे यांची प्राणज्योत मालवली होती. दिवंगत यशवंत हळदे यांच्या निधनाचे वृत संपूर्ण रोहा तालुक्यात पसरताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती. दिवंगत हळदे यांच्या पश्चात पत्नी, २ भाऊ, १ बहिण, ३ मुली , १ मुलगा व हळदे परिवार आहे. त्याचे दशक्रिया विधी शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी अंबा नदि किनारी व उत्तरकार्य मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी राहत्या घरी तामसोली येथे होणार असल्याचे हळदे कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.