महाराष्ट्र ग्रामीण
छोट्या मुलांचे “चाचा नेहरू” रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे शहरासह विभागात हळहळ

छोट्या मुलांचे “चाचा नेहरू” रमाकांत (आप्पा) काळे यांचे अल्पशा आजाराने निधन
नागोठणे शहरासह विभागात हळहळ
महेश पवार
नागोठणे : नागोठणे बाजार पेठेतील व्यापारी व अजित जनरल स्टोअर या स्टेशनरी सामानाच्या दुकानाचे मालक रमाकांत उर्फ आप्पा शिवराम काळे (वय ७४) यांचे रविवार दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगा अजित, सून, नातवंडे यांच्यासह खूप मोठा परिवार आहे. नागोठणे व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल काळे यांचे ते काका होत.
दिवंगत रमाकांत काळे यांच्या पार्थिवावर १६ फेब्रुवारीलाच सायंकाळी ७ वाजता येथील अंबा घाटावरील वैंकुठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी काळे यांचे नातेवाईक, सगे सोयरे, मोठ्या संख्येने असलेला त्यांचा मित्रपरिवार तसेच नागोठणे बाजार पेठेतील व्यापारी व नागोठणेकर नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमाकांत काळे यांना “आप्पा” या टोपण नावाने तसेच छोट्या मुलांची त्यांना खूप आवड असल्याने त्यांना छोट्या मुलांचे “चाचा नेहरू” म्हणून ओळखले जायचे. दिवंगत रमाकांत काळे यांनी नागोठण्यातून आपले शिक्षण पूर्ण करून ते नोकरीसाठी मुंबईला गेले होते. मुंबईतील आपल्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आपल्या नागोठणे गावाप्रती त्यांना असलेल्या प्रेमामुळे त्यांना आपल्या नागोठणे गावाची ओढ लागल्याने सेवानिवृत्ती नंतर त्यांनी लागलीच नागोठण्यात येणे पसंत केले.
नागोठण्यात येऊन शांत बसतील ते आप्पा कसले ? त्यांनी नागोठण्यात येऊन आपला मित्रपरिवार एकत्र केला. त्यानंतर त्यांनी नागोठण्यातील सेवाभावी संस्था असलेल्या नागोठणे लायन्स क्लब मध्ये सभासदत्व स्वीकारले. त्यानंतर मित्रपरिवार व लायन्स क्लबच्या सर्वच कार्यक्रमांत ते हिरीरीने सहभाग घेऊ लागले.
रमाकांत काळे यांच्या आजारपणात त्यांचे मित्र त्यांना भेटायला आल्यानंतर तब्बेतीची काळजी घेण्याबाबत सल्ला देत असत. मात्र त्यावेळी आप्पा आपल्या मिस्किल स्वभावाने “चलती का नाम गाडी, रुकी तो रुकी” असे बोलून आपल्या मित्रांना निरुत्तर करीत असत. अशाप्रकारे एक दिलखुलास जीवन जगलेल्या आप्पांच्या निधनाने नागोठणे शहर व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कै. रमाकांत काळे यांचे दशक्रिया विधी मंगळवार दि. २५ फेब्रुवारी रोजी नागोठण्यातील अंबा घाटावर तर उत्तरकार्य शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी रोजी बाजार पेठेतील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे काळे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे नातू अतुल काळे यांनी सांगितले.