Uncategorized
माझी नम्रता कायम राहो एवढाच आशीर्वाद मला गुरुवर्यांनी द्यावा : खा. सुनील तटकरे
नागोठण्यातील जैन बांधवांनी एक अप्रतिम मंदिराची निर्मिती केल्याचे कौतुक

माझी नम्रता कायम राहो एवढाच आशीर्वाद मला गुरुवर्यांनी द्यावा : खा. सुनील तटकरे
नागोठण्यातील जैन बांधवांनी एक अप्रतिम मंदिराची निर्मिती केल्याचे कौतुक
महेश पवार
नागोठणे : माझ्या चाळीस वर्षातील राजकीय जीवनात मी सर्वांशी नम्रपणे वागलो आहे. माझ्या मनात विकासाचे जे विचार आहेत ते पूर्ण करण्याची ताकद मला मिळो. तसेच लोकहितासाठी जे जे संकल्प मी मनात आणलेत ते सिद्धीस उतरण्याची शक्ती मला मिळो आणि माझी नम्रता कायम राहो एवढाच आशीर्वाद मला गुरुवर्यांनी द्यावा अशी प्रार्थना देशाच्या संसदीय पेट्रोलियम आणि नॅचरल गॅस कमिटीचे अध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी परमपूज्य आचार्य देवकीर्तिसूरीश्वरजी महाराज यांच्याकडे व्यक्त केली. नागोठण्यातील श्री चंद्रप्रभस्वामी भगवान मंदिरात शुक्रवारी (दि.७) अंजनशलाका प्राणप्रतिष्ठा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी परमपूज्य आचार्य भगवंत देवकीर्तिसूरीश्वरजी महाराज यांनी खासदार सुनील तटकरे यांना आशीर्वाद देताना, माणूस जेवढा नम्र असतो तेवढी त्याची प्रगती होते, तुम्ही जीवनात खुप पुढे जा, मोठे व्हा, देशाच्या गौरवासाठी प्रयत्न करा असे माझे अंतर्मनापसून आशीर्वाद असल्याचे बोलल्याचा धागा पकडून खासदार सुनील तटकरे यांनी आपले मन व्यक्त केले.

खा. तटकरे पुढे म्हणाले की, नागोठण्यातील जैन बांधवांनी एकत्र येऊन गेल्या पंधरा वर्षाच्या अपार मेहनतीतून आणि सुमारे वीस कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्रात, रायगड जिल्ह्यात कुठे नसेल अशा अद्वितीय व भव्य अशा मंदिराची निर्मिती नागोठण्यात केली आहे. ऐतिहासिक काळात जशी मंदिरे उभारली गेली तशा प्रकारची मंदिराची कलाकृती निर्माण झाली आहे. त्या मंदिरासाठी आर्थिक मदत करणारे सर्वजण तसेच मंदिर निर्माण करण्याच्या कामातील कारागीर त्यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. या मंदिर परिसरातून जाताना जे वाईट विचार मनात असतील ते नक्कीच बाहेर पडतील. तसेच या मंदिरात येणाऱ्या सर्वांना मनःशांती मिळेल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी जैन सकल संघ नागोठणेचे मॅनेजिंग ट्रस्टी जुगराज जैन, कार्यकारिणी अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, किशोरशेठ जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भाई टके, डॉ. राजेंद्र धात्रक, जीर्णोद्धार समितीचे खजिनदार रमेशकुमार पिताणी, उपखजिनदार सुरेश मुठलिया, सल्लागार ॲड. प्रवीण जैन, सदस्य प्रकाश जैन, सोहनलाल जैन, सुभाष जैन, सुरेश जैन, दिनेश परमार, दिलीप जैन, रितेश दोशी, राजू पिताणी, हसमुख जैन, राकेश जैन, निलेश दोशी, श्रीपाल जैन आदींसह जैन बांधव व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.