महाराष्ट्र ग्रामीण
महामार्ग चौपदरीकरणात बाधित होणारा नागोठणे के. एम. जी. विभागाचा रस्ता व स्मशानभूमीचे काम मार्गी लावा

महामार्ग चौपदरीकरणात बाधित होणारा नागोठणे के. एम. जी. विभागाचा रस्ता व स्मशानभूमीचे काम मार्गी लावा
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे ठेकेदार व अधिकाऱ्यांना आदेश
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार धैर्यशील दादा पाटील यांनी गुरुवार दिनांक २० फेब्रुवारी रोजी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला. या दौऱ्या दरम्यान ते नागोठणे येथील रुची हॉटेल समोरील महामार्गावर आले असता भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस, महामंत्री आनंदभाई लाड, नागोठणे शहर भाजपा सरचिटणीस गणेश घाग आणि भाजपा रोहा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात बाधित बाधित झालेला नागोठण्यातील कुंभार आळी, मराठा आळी व गवळ आळी (के. एम. जी.) विभागात जाण्यासाठी असणारा रस्ता तसेच या विभागाची स्मशानभूमी बाधित झाल्याने येथील ग्रामस्थांची होणारी गैरसोय व रस्त्याची समस्या मांडतांना ही समस्या तातडीने दूर करावी अशी विनंती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना केली.

भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेली सूचना व मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तात्काळ दखल घेऊन या पाहणी दौऱ्यात मंत्र्यांसमवेत असलेले महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्गाच्या कामातील ठेकेदार यांना रस्ता व स्मशानभूमी ही दोन्ही कामे तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश बांधकाम मंत्र्यांनी दिले. यावेळी भाजपचे रोहा तालुका सरचिटणीस आनंदभाई लाड यांनी ग्रामस्थांच्या वतीने बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन सादर केले. त्याचबरोबर महामार्गावर पुढे असलेल्या बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलातील विद्यार्थी व ग्रामस्थ यांच्यासाठी तयार केलेल्या अरुंद पादचारी पुलाचे तातडीने रुंदीकरण करून पुलावर दोन्ही बाजूंनी जाळी लावून हा पूल लवकरात लवकर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचे आदेशही यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले.
याचबरोबर या पाहणी दौऱ्यात मुरवाडी येथील महामार्गावर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा पाटील थांबले असता नागोठणे विभागातील रस्ते, पाणी व इतर समस्या याविषयी भाजपाचे तालुका महामंत्री आनंद लाड, शहराध्यक्ष सचिन मोदी, शिवसेना विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, भाजपा तालुका क्रीडा संयोजक शेखर गोळे, शहर सरचिटणीस गणेश घाग, तालुका उपाध्यक्ष शिक्षण सेल धनराज उमाळे यांनी सविस्तर चर्चा केली.