महाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यातील श्री अष्टविनायक पतसंस्थेला “कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार” जाहीर

नागोठण्यातील श्री अष्टविनायक पतसंस्थेला “कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार” जाहीर
महेश पवार
नागोठणे : मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पतसंस्थांसाठी दिला जाणारा “कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५” नागोठण्यातील नावाजलेल्या श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला जाहीर झाला आहे. २ ते ५ कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या पतसंस्थांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला देण्यात येणार आहे.

कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे दोन दिवशीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कुरूळ – अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवशी आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशना दरम्यान श्री अष्टविनायक सहकारी पतसंस्थेला द्वितीय क्रमांकाचे रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मिळविलेल्या या यशाबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.