महाराष्ट्र ग्रामीण
रायगड प्रेस क्लब च्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लागले : खा. सुनील तटकरे
उत्कृष्ठ पत्रकारांना पुरस्कार प्रदान

रायगड प्रेस क्लब च्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विविध प्रश्न मार्गी लागले : खा. सुनील तटकरे
दै सागरच्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी यांना आचार्य अत्रे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार
उत्कृष्ठ पत्रकारांना पुरस्कार प्रदान
रायगड व खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन व पुरस्कार प्रदान सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
रायगडचा बुलंद आवाज टीम
खोपोली : पत्रकारांच्या समस्यांबाबत लोकप्रतिनिधी जागरूक असून, केंद्र स्तरावर पत्रकार संरक्षण कायदा पारित होण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहोत. पत्रकारांच्या पाठपुराव्यामुळेच विविध प्रश्न मार्गी लागल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी येथे सांगितले. तसेच रायगड प्रेस क्लब व खालापूर प्रेस क्लब ही पत्रकारांची संस्था एक आदर्श सामाजिक संस्था असल्याचे गौरव उद्गारही यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी काढले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांनी रायगड प्रेस क्लबचा कार्याचा आढावा घेत जिल्हा व खालापूर प्रेस क्लब च्या कार्याचे कौतुक केले तसेच माजी अध्यक्ष मनोज खांबे व नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या कार्याचे कौतुक केले. पत्रकार संरक्षण कायदा, पत्रकार आरोग्य विमा, अधिस्वीकृती, पेन्शन योजना अशा विविध प्रलंबित विषयावर त्यांनी वक्त्यव्य केले.

रायगड प्रेस क्लब संलग्न असलेल्या खालापूर प्रेस क्लबचा वर्धापन दिन सोहळा तसेच रायगड प्रेस क्लबचा २० वा वर्धापन दिन व पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी(दि.१४) खोपोली येथील महाराजा मंगल कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे उद्घाटन खासदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे व मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त व रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, न्यूज 18 लोकमत चे वृत्त निवेदक विशाल परदेशी, दै सागरचे संचालक प्रशांत जोशी ,परिषदेचे माजी अध्यक्ष शरद पाबळे, जिल्हा अध्यक्ष मनोज खांबे, मराठी परिषदेचे कोकण सचिव अनिल भोळे, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती अध्यक्ष विजय मोकल, कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे, उपाध्यक्ष मोहन जाधव,माजी अध्यक्ष अभय आपटे, भारत रंजणकर, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ता मसुरकर यांच्यासहित राजकीय व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्धापन दिना निमित्त रायगड प्रेस क्लब कडून रायगड जिल्ह्यातील पत्रकार तसेच खालापूर खोपोली परिसरातील पत्रकार व विविध क्षेत्रात नावीन्य पूर्ण कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रायगड प्रेस क्लब कडून यात आचार्य अत्रे राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार दै सागरच्या संपादिका श्रीमती शुभदा जोशी यांना व जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार आनंद जोशी यांना, कै. निशिकांत जोशी स्मृती पुरस्कार विजय कडू यांना, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार पुरस्कार स्वाती घोसाळकर, पत्रकार धम्मशील सावंत यांना दीपक शिंदे स्मृती पुरस्कार, स्व. प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकारिता पुरस्कार कमलेश ठाकूर , स्व. जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकारिता पुरस्कार राजेंद्र जाधव, स्व. संतोष पवार स्मृती पत्रकार पुरस्कार समाधान दिसले, स्व. सचिन पाटील स्मृती पत्रकार प्रकाश कदम यांना, सागर जैन, उत्तम तांबे, कुमार देशपांडे यांना व रायगड जिल्हा श्रमिक पत्रकार संघाचा पुरस्कार उत्तम तांबडे, गणेश चोडणेकर यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावेळी खालापूर प्रेस क्लब कडून खालापूर खोपोली व खालापूर तालुक्यात राजकीय, वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, प्रशासकीय क्षेत्रासह अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवर व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात आदर्श सामाजिक पुरस्कार – दिनेश जाधव, आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार – माजी नगरसेविका मानसी काळोखे, आदर्श प्रशासकीय अधिकारी पुरस्कार – नायब तहसीलदार विकास पवार, आदर्श राजकीय व्यक्ती पुरस्कार – प्रफुल्ल विचारे, आदर्श व्यावसायिक पुरस्कार काशी होम्स, आदर्श सरपंच महेश पाटील, आदर्श शिक्षक श्रीकांत खेडकर, आदर्श वैद्यकीय सेवा सुमित जाधव व डॉ स्वाती भिसे, जीवन गौरव पुरस्कार बाळाराम म्हात्रे आदर्श ग्रामपंचायत पुरस्कार – ग्रुप ग्रामपंचायत वडवळ यांना प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यमान अध्यक्ष मनोज खांबे यांनी केले. यावेळी परिषदेचे राज्य अध्यक्ष मिलींद अष्टीवकर, विशाल परदेशी, शरद पाबळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी आभार प्रदर्शन नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रायगड प्रेस क्लब चे सर्व पदाधिकारी, खालापूर प्रेस क्लबचे प्रशांत गोपाळे, अनिल पाटील, एस.टी.पाटील, रविंद्र मोरे, समाधान दिसले, काशिनाथ जाधव, संतोषी म्हात्रे, राज साळुंखे, नवज्योत पिंगळे, भाई जगन्नाथ ओव्हाळ आदींनी मेहनत घेतली.
या वर्धापन दिन व पुरस्कार सोहळ्यात महेश बुवा देशमुख यांचा बहारदार मराठी, हिंदी गीतांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.