महाराष्ट्र ग्रामीण
श्री अष्टविनायक पतसंस्थेला मिळालेला पुरस्कार हा छोट्या व्यावसायिकांना उभे राहण्यासाठी केलेल्या सेवेचे हे फळ
श्री अष्टविनायक पतसंस्थेला "कोकण पतसंस्था भूषण २०२५" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान
श्री अष्टविनायक पतसंस्थेला मिळालेला पुरस्कार हा छोट्या व्यावसायिकांना उभे राहण्यासाठी केलेल्या सेवेचे हे फळ
पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांचे मत
श्री अष्टविनायक पतसंस्थेला “कोकण पतसंस्था भूषण २०२५” पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान
संविधानाची प्रत देऊन केला गौरव
महेश पवार
नागोठणे : विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोकण विभाग, नवी मुंबई व कोकण विभाग नागरी सहकारी पतसंस्था संघ मर्यादित, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोकणात सर्वोत्कृष्ट कार्य करणाऱ्या पतसंस्थांसाठी दिला जाणारा “कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार २०२५” हा २ ते ५ कोटी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या पतसंस्थांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार नागोठण्यातील नावाजलेल्या श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला १६ फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या भव्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. रोख रक्कम रू. ५ हजार, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व संविधानाची प्रत असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग मला पाच जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे दोन दिवशीय अधिवेशन रायगड जिल्ह्यातील कुरूळ – अलिबाग येथील क्षात्रैक्य समाज हॉल येथे १५ व १६ फेब्रुवारी या दोन दिवशी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी हा नेत्रदीपक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था ही आमचे मार्गदर्शक व श्री अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक जयराम पवार सर यांनी नागोठण्यातील के. एम. जी.(कुंभार आळी, मराठा आळी, गवळ आळी) विभागातील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडीअडचणीच्या वेळी उपयोग व्हावा तसेच छोट्या छोट्या व्यावसायिकांच्या आर्थिक गरजेसाठी आम्हाला सोबत घेऊन २७ वर्षांपूर्वी स्थापन केली होती. २७ वर्षांपूर्वी स्थापन झालेली नागोठण्यातील ही सर्वात जुनी पतसंस्था असून संस्थेला कोकण पतसंस्था भूषण पुरस्कार, २०२५ ने सन्मानित करण्यात आले ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या पतसंस्थेला मिळालेला पुरस्कार हा आमच्या सर्वसामान्य सभासदांच्या आर्थिक गरजेच्यावेळी व छोट्या व्यावसायिकांना गरजेच्या वेळी त्यांना उभे राहण्यासाठी केलेल्या सेवेचे हे फळ असल्याचे मत श्री अष्टविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर “रायगडचा बुलंद आवाज” शी बोलतांना व्यक्त केले. आज या पतसंस्थेचे वटवृक्षात रूपांतर झालेले असतांनाच या पुरस्काराच्या रूपाने संस्थेच्या शिरेपेचात एक मानाचा तुरा रोवला गेला असून संस्थेचे सर्व पदाधिकारी, सभासद, कर्मचारी, ठेवीदार व कर्जदार यांच्या मेहनतीचे हे फळीत असल्याने या पुरस्कारांपासून प्रेरणा घेऊन भविष्यात संस्थेची अधिकाधिक भरभराट होण्यासाठी आम्ही कामाला लागू… श्री. अष्टविनायक पतसंस्थेचे संस्थापक श्री. जयराम पवार सर प्रकृती अस्वस्थेमुळे जरी या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नसले तरी नंतर त्यांनी आमचे हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी दिलेली कौतुकाची थाप आम्हाला पुढील कार्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल – विलास चौलकर, अध्यक्ष, श्री अष्टविनायक पतसंस्था

महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार श्री अष्टविनायक पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, उपाध्यक्ष महादेवसिंग परदेशी, सचिव प्रफुल्ल नागोठणेकर, खजिनदार रतन हेंडे, संचालक प्रकाश जाधव, संचालिका श्वेता चौलकर, वृषाली जोगत, संध्या सांगले, व्यवस्थापिका शैला घासे, शिपाई अशोक गायकवाड, कविता प्रकाश जाधव, सुजित विलास चौलकर यांनी स्वीकारला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य प्राधिकरणाचे आयुक्त अनिल कवडे, आमदार निरंजन डावखरे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, कोकण विभाग नागरी सह. पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश तुळपुळे, कोकण विभाग सहाय्यक निबंधक सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मिलिंद भालेराव, भाजपाचे रायगड लोकसभा मतदार संघ प्रमुख सतीश धारप, निवृत्त सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे, आदर्श पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील, कमळ नागरी सहकारी अत्संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार चाळके, रायगड जिल्हा सहकारी पतसंस्थांचे उपनिबंधक प्रमोद जगताप, रत्नागिरी जिल्हा सहकारी पतसंस्थांचे उपनिबंधक डॉ. सोपानराव शिंदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या अधिवेशनात श्री अष्टविनायक पतसंस्थेच्या संचालिका श्वेता चौलकर, वृषाली जोगत, संध्या सांगले सहभागी झाल्या होत्या. तर कोकणातील सुमारे ५०० पतसंस्थांच्या संचालकांनी या अधिवेशनात सहभाग नोंदविला.
श्री अष्टविनायक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेने मिळविलेल्या या यशाबद्दल पतसंस्थेचे अध्यक्ष विलास चौलकर, सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग व त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.