महाराष्ट्र ग्रामीण
उच्च वीज दाब वाहिनीचे काम करायचे नाही म्हणजे नाही
जेएसडब्ल्यू कंपनीच्या टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा विरोध कायम

उच्च वीज दाब वाहिनीचे काम करायचे नाही म्हणजे नाही !
जेएसडब्ल्यू कंपनीच्या टॉवर लाईनला शेतकऱ्यांचा विरोध कायम
पेण प्रांत कार्यालयातील बैठकीत शेतकरी आक्रमक
बाधित शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम
महेश पवार
नागोठणे : जेएसडब्लू (जिंदाल स्टील वर्क) कंपनीच्या उच्च वीज दाब वाहिनीच्या कामात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अद्याप कोणताच तोडगा निघालेला नाही. त्यामुळे शुक्रवारी(दि.२१) पेण प्रांत कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीत पळस, शेतपळस, कोलेटी, खारकोलेटी, आमटेम पासून डोलवी पर्यंतच्या एकवटलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बाधित शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत उच्च वीज दाब वाहिनीचे काम करायचे नाही म्हणजे नाही अशी सक्त ताकीद शेतकऱ्यांच्या वतीने उपस्थित भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष, युवा नेते वैंकुठशेठ पाटील, शिवसेना युवासेनेचे जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे यांनी जेएसडब्लू प्रशासनाचे अधिकारी व ठेकेदार बी.एन.सी पॉवर प्रोजेक्ट लि. यांना दिली.

पेण उप विभागीय कार्यालयात संपन्न झालेल्या या बैठकीला पेणचे प्रांताधिकारी प्रवीण पवार, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैंकुठशेठ पाटील, शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख संजय म्हात्रे, जेएसडब्लू प्रशासनाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे व महापारेषणचे अधिकारी, कोलेटी येथील जनशक्ती संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रभाकर डाकी, पदाधिकारी तसेच पळस ते डोलवी पर्यंतचे शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या कानसई – नागोठणे ते डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत ४००/२२० के.व्ही. ही उच्च वीज दाब वाहिनी टाकण्याच्या कामात जेएसडब्ल्यू कंपनी प्रशासन व संबधित ठेकेदार कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच आहे. त्यामुळे या बेकायदेशीरपणे काम सुरू असलेल्या उच्च वीज दाब वाहिनी विरोधात आता शेतकरी एकवटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून पेण प्रांताधिकाऱ्यात उपस्थित शेतकऱ्यांनी उच्च वीज वाहिनीविरोधात आपला आक्रोश व्यक्त केला.
“ठेकेदार कंपनीचा बोलबच्चन बैठकीस न येता गेला पळून….”“जेएसडब्लू कंपनीने ज्या बी.एन.सी पॉवर प्रोजेक्ट लि. या दुस-या एका खासगी कंत्राटदार कंपनीला उच्च दाब वीज वाहिनी टॉवर लाईनचे काम करण्यासाठी नेमले आहे त्या कंपनीचा येथील केअर टेकर म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवून त्यांना आर्थिक फायदा करून देतो असे सांगत वावरणारा व सध्या पळस येथील एका खासगी फार्म हाऊस मध्ये राहत असलेला एक जण पेण प्रांत कार्यालयातील बैठकीसाठी येऊनही बाहेरच्या बाहेर पळून गेला. तसेच जर तो आला असता तर त्याने शेतकऱ्यांचा मार खाल्ला असता असे कोलेटी येथील शेतकऱ्यांनी सांगितले.”
“ज्या शेतक-यांच्या जागेतून ही उच्च दाबाची वीज वाहिनी जाणार आहे त्या जागेत संबंधित शेतकऱ्यांना भातशेती करता येणार नाही. जमिनीवरून जाणाऱ्या उच्च दाबाच्या वीज वाहिनीमुळे अशी जमीन भविष्यात कुणीही विकत घेणार नाही अथवा शेतकरी या जागेचा विकासही करु शकणार नाही. त्यामुळे शेतक-यांच्या जमिनी कवडीमोल होणार आहेत. त्यामुळेच जेएसडब्ल्यू व ठेकेदार कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत.”
उच्च वीज दाबाच्या वाहिनीच्या कामात शेतकऱ्यांचा जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीस देणे गरजेचे असताना तसे न करता जबरदस्तीने काम करणे योग्य नसल्याने जोपर्यंत याप्रकरणी नुकसान भरपाई म्हणून योग्य आर्थिक मोबदला देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे अन्यथा रोख ठोक भूमिका घेतली जाईल – वैंकुठशेठ पाटील – युवा नेते, भाजपा
शिवसेनेचे युवा नेते संजय म्हात्रे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करतांना शेतकऱ्यांच्या जागेत दंडेलशाही पद्धतीने टॉवर उभारण्याच्या या कामात शेतकऱ्यांचा विरोध असूनही प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली आहे. या बैठकीस कुणीही सक्षम अधिकारी उपस्थित नसल्याने निर्णय झालेला नाही. त्यामुळे या उच्च वीज दाब वाहिनीच्या विरोधात लढा सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.
जेएसडब्लू कंपनीच्या या ३० किलोमीटर लांबीच्या वीजवाहिनीचे सर्वेक्षण करतांना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. या उच्चदाब वीज वाहिनीच्या खालील शेतजमीन तसेच वीज वाहिनीपासून दोन्ही बाजूकडील शेत जमीन मोठ्या प्रमाणात बाधित होऊन शेतक-यांचे नुकसान होणार आहे. या वाहिनीचे मनोरे उभारण्याचे काम व वीज वाहिन्या टाकण्याचे काम जेएसडब्लू कंपनीने बी.एन.सी पॉवर प्रोजेक्ट लि. या दुस-या एका खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. असे असतांनाच ज्या शेतक-यांच्या शेतातून ही उच्चदाब वीजवाहिनी जाणार आहे त्या शेतक-यांना विश्वासात न घेतल्याने शेतक-यांत संतापाची लाट उसळली असून या प्रकाराला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.