महाराष्ट्र ग्रामीण
२७ वर्षांनंतर भरली आठवणींची शाळा !
वांगणी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर

२७ वर्षांनंतर भरली आठवणींची शाळा !
वांगणी हायस्कूलच्या १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर उत्साहात साजरा
दिनेश ठमके
सुकेळी : सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली या संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वांगणी (स्थळ- बाळसई) हायस्कूलच्या १९९७ या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा एकत्र येत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल २७ वर्षांनंतर अनेक माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर नुकताच पाली जवळील उन्हेरे येथिल हेडन फार्म हाऊसवर अतिशय उत्साहात संपन्न झाला.
शाळा या दोन अक्षरी शब्दात किती विश्व सामावलंय याची जाणीव खरं तर आपल्याला शाळा सोडून काही वर्षं झाल्यानंतर होते. शाळेचे दिवस खरचं खूप भारी वाटतात. शाळेतलं प्रेम, मित्रांसोबत केलेली मस्ती, मैदानावरचे खेळ, सरांचे बोलणे, पेपरला केलेली काॅपी, तास चालु असतांना केलेली बडबड सगळं आठवत असले तरी शाळेचे दिवस परत येत नाहीत. शाळा सोडल्यानंतरही हीच शाळा, शाळेतील शिक्षक आणि शाळेच्या आठवणी या आयुष्यभर आठवणीत असतात. सुधागड एज्युकेशन सोसायटी संस्थेच्या माध्यमिक विद्यालय वांगणी हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन गेट टुगेदरची मज्जा घेतली. यावेळी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत प्रत्येकाने आप आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सर्व उपस्थित गुरूजन वर्गांना एक छोटीशी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिलाधर जांबेकर यांनी केले. छोटेखानी झालेल्या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक विकास म्हात्रे, नरेंद्र पाटील, विद्यार्थी एकनाथ ठाकूर, प्रमोद जांबेकर, लीलाधर जांबेकर, प्रज्योत खांडेकर, राजेंद्र शिंदे, दत्ता शेडगे, विवेक जांबेकर, राजा जांबेकर, किसन सुतार, शंकर जांबेकर, सुनिल कदम, अनंत कामथे, योगिता तेलंगे, सुगंधा यादव भोकटे, गीता तेलंगे चव्हाण, अपर्णा पाटेकर जांबेकर आदी विद्यार्थी उपस्थित होते.