महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
आमदार महेंद्र थोरवे यांच्या बेताल वक्तव्याचा नागोठणे राष्ट्रवादीकडून निषेध
विभागीय अध्यक्ष संतोष भाई कोळी यांचा कडक शब्दांत इशारा

आमदार महेंद्र थोरवे यांच्या बेताल वक्तव्याचा नागोठणे राष्ट्रवादीकडून निषेध
विभागीय अध्यक्ष संतोष भाई कोळी यांचा कडक शब्दांत इशारा
राष्ट्रवादीचे नेते भाई टके यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद
महेश पवार
नागोठणे : कर्जत – खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांची जीभ दिवसेंदिवस घसरत चालली आहे. राज्याच्या सत्तेत महायुती एकत्रितपणे काम करीत असतानाही महायुतीचा कोणताच धर्म आमदार थोरवे पाळण्यास तयार नाहीत. आमचे नेते व रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका करताना थोरवे यांच्याकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे महेंद्र थोरवे यांनी आपल्या तोंडाला आवर घालावा अन्यथा आम्हीही महायुतीचा धर्म विसरून तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ अशा कडक शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी यांनी आ. महेंद्र थोरवे यांना इशारा दिला आहे.
रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात आ. महेंद्र थोरवे यांनी नुकत्याच केलेल्या एका बेजबाबदार वक्तव्याचे पडसाद संपूर्ण रायगड जिल्ह्यातून उठत असतानाच नागोठण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे विभागीय नेते भाई टके यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी व शहर अध्यक्ष बाळासाहेब टके यांनी पत्रकार परिषद घेत आ. थोरवे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय ज्येष्ठ नेते भाई टके, ज्येष्ठ नेते व रोहा पंचायत समितीचे माजी सदस्य हरिषशेठ काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नागोठणे विभागीय अध्यक्ष संतोषभाई कोळी, नागोठणे शहराध्यक्ष बाळासाहेब टके, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रोशन पारंगे, अनिल पाटील, प्रमोद चोरगे यांच्यासह राष्ट्रवादीचे नागोठण्यातील कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.