महाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
दिवा सावंतवाडी व जलद गाड्यांना नागोठण्यात हवाय थांबा
खासदार धैर्यशीलदादा पाटील यांना नागोठणे प्रवासी संघटनेचे निवेदन

दिवा सावंतवाडी व जलद गाड्यांना नागोठण्यात हवाय थांबा
खासदार धैर्यशीलदादा पाटील यांना नागोठणे प्रवासी संघटनेचे निवेदन
नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर खा.धैर्यशीलदादा पाटील यांच्याशी चर्चा
महेश पवार
नागोठणे : शिवकालीन वारसा लाभलेले तसेच भोगोलिक दृष्ट्या रायगड जिल्हाचे महत्वाचे मध्यवर्ती ठिकाण व औद्योगिक क्षेत्र असुनही अनेक समस्यांनी ग्रासलेल्या नागोठणे रेल्वे स्थानकाला मध्य व कोकण रेल्वेकडून गेल्या अनेक वर्षांपासून सापत्न वागणूक दिली जात आहे. मध्यवर्ती स्थानक असूनही
कोकणात जाणाऱ्या महत्वाच्या दिवा सावंतवाडी दिवा या प्रवासी गाडीसह इतर काही गाड्यांना नागोठण्यात थांबा नाही. त्यामुळे येथील नागोठणे प्रवासी संघटना आता आक्रमक झाली असून महत्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा व स्थानकातील अनेक प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नागोठणे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी(दि. १५) सकाळी राज्यसभेचे खासदार धैर्यशीलदादा पाटील यांची भेट घेऊन नागोठणे रेल्वे स्थानकातील विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी खासदार धैर्यशीलदादा पाटील यांनीही याविषयी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्नावर राज्यसभेत आवाज उठविला जाईल असे ठोस आश्वासन नागोठणे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
वाक्रुळ – पेण येथील खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला नागोठणे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ऋषिकेश भोय, उपाध्यक्ष विश्वास गायकर, सचिव संदेश सुकाळे, गणेश घाग, हर्षल दुर्वे आदी उपस्थित होते.

नागोठणे परिसरात रिलायन्स एन.एम.डी (पूर्वीची आयपीसीएल), जिंदाल ग्रुपची महाराष्ट्र सिमलेस लिमिटेड, विभोर स्टील ट्यूब्स, सुप्रीम पेट्रोकेमिकल्स, जे.एस.डब्ल्यू स्टील असे मोठ मोठे कारखाने आहेत. तसेच नागोठणे शहराच्या आजूबाजूला पेण तालक्यातील अर्धा भाग, रोहा तालुक्यातील अर्धा भाग व सुधागड तालुक्याचा काही भाग असे मिळून १५० पेक्षा अधिक गावे आहेत. या सर्वांना रेल्वे प्रवासाकरिता मध्य रेल्वेचे नागोठणे रेल्वे स्थानकातच यावे लागते. ३८ वर्षांपूर्वी चालू झालेल्या कोकण रेल्वेने तर येथील प्रकल्पग्रस्त व स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसली. महाराष्ट्र राज्याचा सर्वात मोठा आर्थिक भाग उचलूनही येथील जनतेच्या हातात काहीच लागले नाही. गेली ३८ वर्षापेक्षा जास्त काळापासून येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी केवळ दोनच मेमू गाड्यांच्या फेऱ्या होत आहेत. सकाळी ५.३० ला जाणारी व परत येणारी रोहा – दिवा – रोहा आणि दुपारी ४.१५ ला जाणारी आणि रात्री परत येणारी रोहा दिवा रोहा या दोनच गाड्या आहेत. दुसरी सकाळची एक फेरी मागील एक वर्षा पासून वाढीव चालू झाली. पण ती देखील शनिवार आणि रविवारी बंद असते.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या अगदी बाजूलाच असलेले नागोठणे शहर आणि मुंबई यामध्ये फक्त १०० कि.मी चेच अंतर आहे. तरीही येथील परिसरातील मोठ्या संख्येने असलेल्या प्रवाशांना आज जर मुंबईच्या कोणत्याही उपनगरात जायचे असेल तर किमान ४ तास लागतात. म्हणून नागोठणे विभागातून जाण्यासाठी रोहा-दिवा-रोहा, रोहा-कल्याण-रोहा, रोहा-डहाणू-रोहा या मार्गावर किमान दर एक तासाला मेमू किंवा लोकल सेवा चालू व्हावी आणि आमचा मार्ग सुखकर व्हावा अशी मागणीही नागोठणे प्रवासी संघटनेच्या निवेदनात करण्यात आली आहे. रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकण होऊन देखील आता अनेक वर्षे उलटली तरी परिस्थिती अजून जैसे थे आहे. तसेच नागोठणे प्लॅटफॉर्मची उंची देखील कमी आहे. त्यामुळे वयोवृद्ध माणसे, स्त्रिया, बालक मुलांना ट्रेन मधे चढायला व उतरायला खूप अडचणी येतात आणि त्यात अपघात होऊन अनेक जणांनी आपले प्राण तसेच अवयव (हात-पाय) गमावले आहेत व त्यांना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीही कोणीही याची दखल घेत नाही. आज अनेक वर्षे रेल्वेच्या फेऱ्या नसल्यामुळे या विभागातील नागरिक मुंबईत नाईलाजाने भाड्याने रूम घेऊन राहत आहेत. पण याचा अतिरिक्त ताण ह्या शहरांच्या यंत्रणेवर होत आहे. आधीच मुंबई आणि तिची उपनगरे गर्दीने आता गुदमरून लागली आहेत त्यांना वाचवायचे असेल तर बाकीचे जे पर्याय आहेत त्याचा विचार करणे अतिशय गरजेचे झाले आहे.
नागोठणे प्रवासी संघटनेच्या या आहेत मागण्याकोरोना पूर्वी गाडी नं. १०१०५ – १०१०६ दिवा – सावंतवाडी – दिवा ही प्रवासी गाडी नागोठणे स्थानकात थांबत असे. मात्र कोरोना नंतर या गाडीचा थांबा बंद करण्यात आला आहे. तो थांबा पूर्ववत देण्यात यावा तसेच गाड़ी नं १२६१७ – १२६१८ एर्णाकुलम जं – हज़रत निज़ामुद्दीन – एर्णाकुलम जं, १२६१८ – १२६२० व मुंबई एल टी टी – मंगलोर – मुंबई एल टी टी या एक्प्रेस गाड्यांना नागोठणे रेल्वे स्थानकात थांबा मिळावा. तसेच नागोठणे रेल्वे स्थानकात तिकीट आरक्षण केंद्र सुरु करण्यात यावे, प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी,नागोठणे रेल्वे स्थानकात सगळे इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे मात्र आवश्यकता आहे ती रेल्वे मंत्रालय व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीची. आणि आम्हाला आमच्या गावात राहूनच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्हीही आमचे योगदान देण्यास तयार आहोत असेही या निवेदनात म्हटले आहे.