हेदवली येथिल राष्ट्रवादीचे नेते तानाजी लाड यांचे अपघाती निधन
ऐनघर पंचक्रोशी मध्ये हळहळ

हेदवली येथिल राष्ट्रवादीचे नेते तानाजी लाड यांचे अपघाती निधन
ऐनघर पंचक्रोशी मध्ये हळहळ
दिनेश ठमके
सुकेळी : रोहा तालुक्यातील नागोठणे जवळच असलेल्या हेदवली येथिल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी लक्ष्मण लाड यांचे शुक्रवार दि. ७ मार्च रोजी पाली येथे जात असतांना अपघाती निधन झाले. त्यामुळे संपूर्ण ऐनघर पंचक्रोशी मध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे . निधनासमयी त्यांचे वय ६७ वर्षे होते.
कै. तानाजी लाड हे आपले नातेसंबंधातील वांगणी येथिल गजानन तेलंगे यांच्यासह सकाळी १० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त पाली या ठिकाणी जात असतांना वाकण – पाली मार्गावरील एकलघर गावाच्या समोर लाड यांच्या दुचाकीसमोर कुत्रा आल्यामुळे कुत्र्याला धडकुन दुचाकीला अपघात झाला. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेले तेलंगे हे गाडीवरुन मागच्या मागे उडुन रस्त्याच्या बाजुला पडले. तर लाड हे जवळपास १५ ते २० फुटाच्या अंतरावर रस्त्यावरुन फरफटत जाऊन त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली. त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी पेण येथे नेत असतांनाच त्यांचे निधन झाले. लाड यांच्या निधनाची बातमी सर्वत्र पसरताच त्यांच्या अंत्ययात्रेला हेदवली येथिल निवासस्थानी सामाजिक, राजकीय, क्षेत्रातील नागोठणे विभागातील मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमला होता.
कै. तानाजी लाड यांच्यावर हेदवली येथिल स्मशानभूमीत शुक्रवारीच सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, ३ भाऊ, ३ बहिणी तसेच मोठ्या प्रमाणात परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी रविवार दि. १६ मार्च रोजी हेदवली येथील नदीवर तर उत्तरकार्य बुधवार दि.१९ मार्च रोजी त्यांच्या राहत्या घरी हेदवली येथे होणार असल्याचे लाड कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे.