मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
आमटेम ते नागोठणे फाटा पुढे इंदापूर, माणगांव चक्का जाम

मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
शिमगा उत्सवामुळे अनेकांनी गावचा धरला रस्ता
आमटेम ते नागोठणे फाटा पुढे इंदापूर, माणगांव चक्का जाम
अनिल पवार
नागोठणे : कोकणातील महत्त्वाच्या होळी उत्सवाच्या निमित्ताने मुंबई शहर व उपनगरातून तसेच ठाणे, कल्याण या ठिकाणाहून चाकरमानी कोकणात आपापल्या गावी बुधवारी (दि.१२) रात्रीपासूनच विविध वाहनांच्या माध्यमातून जायला निघाले असल्याने मुंबई गोवा महामार्गावर गुरुवारी (दि.१३) पहाटे पासून आमटेम ते नागोठणे फाटा तसेच पुढे इंदापूर ते माणगाव दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने ऐन शिमगोत्सवात प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. महामार्गावर शिमगा उत्सवाच्या धर्तीवर कोकणात जाणाऱ्या वाहनांची बुधवारी रात्री पासूनच वर्दळ वाढली होती. मात्र महामार्गावरील वाहनांची संख्या अधिकच वाढल्याने गुरुवारी पहाटे पासूनच वडखळ पासून पुढे आमटेम ते नागोठणे फाटा तसेच कोलाड ते इंदापूर बायपास,माणगाव ते लोणेरेदरम्यान वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे महामार्गावर प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी झाली. यामुळे कोकणच्या दिशेने जाणार्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत. या कोंडीमुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.
शिमगा उत्सवामुळे अनेकांनी गावचा रस्ता धरला. त्यामुळे महामार्गावर एकच वाहनांची संख्या वाढली. परिणामी वाहतूक कोंडी वाढली. वडखळ ते कोलाड, इंदापूर बायपास, माणगाव बाजारपेठ ते लोणेरे हायवे नाका इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. कोलाड ते महाड या तासाभराच्या प्रवासाला अडीच ते तीन तास लागत असल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. तर दुसरीकडे मुंबईकडे जाणाऱ्यांना प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून बाहेर पडून मुंबईला लवकर पोहोचण्याची घाई झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने चालवली जात आहेत. परिणामी, ही वाहतूक कोंडी झाली असून, महामार्ग वाहतूक पोलीस ऐनघर व महाड येथील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी ही कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, ही कोंडी सोडवायला पोलीस बळ कमी पडत असल्याचे दिसून येते, त्यामुळे उपलब्ध कर्मचार्यांची दमछाक होत असल्याचेही यावेळी दिसून आले.
दरम्यान महामार्गावरील आमटेम ते नागोठणे फाटा दरम्यान सकाळी पहाटे पासूनच झालेली वाहतूक कोंडी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत दुपारी साडेबारा पर्यंत सोडवून वाहतूक सुरळीत केली. तर इंदापूर बायपास या ठिकाणी झालेली प्रचंड मोठी वाहतूक कोंडी सोडवून महामार्ग वाहतूक पोलीसांच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी तीन नंतर वाहतूक सुरळीतपणे चालू करण्यात आली. मात्र यावेळी माणगाव शहराच्या प्रवेशव्दाराच्या आधीपासून पुढे लोणेरे बाजूस झालेल्या वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी चाकरमान्यांना कडकडीत उन्हात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.
होळी उत्सव तसेच सलगच्या लागलेल्या सुट्टया यामुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली असल्याने मुंबई गोवा महामार्गावर वडखळ ते कोलाड दरम्यान आमटेम ते नागोठणे फाटा तसेच कोलाड ते इंदापूर बायपास याठिकाणी वाहतूक कोंडी झाली. यावेळी कोकणात होळी उत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या वाहतूक कोंडीतून लवकरात लवकर मोकळे करण्यासाठी महामार्ग वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी महामार्गावर वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी उपस्थित असून सकाळी झालेली आमटेम ते नागोठणे फाटा तसेच इंदापूर बायपास येथील वाहतूक महामार्ग पोलीसांकडून दुपारपर्यंत सुरळीत चालू करण्यात आली आहे.
गितांजली जगताप
-सहाय्यक पोलीस निरीक्षक महामार्ग वाहतूक शाखा
चौपदरीकरणाच्या नियोजन शून्य अर्धवट कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी..
मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर यादरम्यान सुरु असलेल्या पहिल्या टप्प्यातील नियोजन शून्य अर्धवट कामामुळे सण उत्सवात महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने प्रत्येक वेळी अशी वाहतूक कोंडी होत असते आणि त्याचा मनस्ताप हा प्रवाशांना वारंवार होत असतो. पहील्या टप्प्यातील अर्धवट अवस्थेत असलेले आमटेम येथील उड्डाणपूल, नागोठणे येथील हॉटेल कामथ, मिरानगर तसेच हायवे नाका येथील उड्डाणपूल, कोलाड नाका येथील उड्डाणपूल यांसह अनेक ठिकाणी असलेल्या चौपदरीकरणाच्या नियोजन शून्य अर्धवट कामामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे महामार्गावरील अर्धवट कामांचे योग्य नियोजन करून कामांची योग्य दिशेने युद्ध पातळीवर काम सुरु ठेवून मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम मार्गी लावावेत अशी मागणी सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे संबंधित महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार या विषयांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष केंद्रित करून चौपदरीकरणाचे काम मार्गी लावतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.