
सुकेळी खिंडीत टँकर दुभाजकवर धडकून पलटी झाल्याने भीषण अपघात!
चालक गंभीर जखमी : याच ठिकाणी वळणावर चौथ्यांदा अपघात
कायय स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी
अनिल पवार/दिनेश ठमके
नागोठणे : सुमारे पंधरा वर्षांहून अधिक काळ वनवास भोगत असलेल्या मुंबई -गोवा महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्या टप्प्यात चौपदरीकरणाच्या कामात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकारी वर्गाकडून होत असलेले दुर्लक्ष त्यातून ठेकेदारांकडून सुरु असलेल्या नियोजन शून्य कामामुळे देशातील प्रमुख मार्गांपैकी एक असलेल्या कोकणची जीवनवहिनी म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्यास थांबता थांबत नाहीत. दरम्यान याच महामार्गावरील अपघातग्रस्त खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती नागोठणे बाजूला चौथ्यांदा खैरवाडी गावाजवळ रविवारी ( दि.१६ ) रोजी सायंकाळी ६.१५ वाजण्याच्या सुमारास महाड बाजुकडुन पनवेलकडे जाणा-या सिमेंट रेडी मिक्स वाहतूक करणाऱ्या टँकर वरील चालकाचे आपल्या गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात होऊन यात टँकर चालक गंभीर जखमी झाला आहे.
या अपघाता संदर्भात मिळालेल्या अधिक माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोलाड बाजूकडून पनवेलकडे सिमेंट रेडी मिक्स वाहतूक करणारा टँकर क्रं एम. एच. ४३ बीजी. ६८३७ हा सुकेळी खिंडीच्या नागोठणे बाजूकडील खैरवाडी गावासमोरील वळणावरील तीव्र उतारावर आला असता टँकर चालक नितीन कुमार यादव (वय-२५ वर्षे) याचे आपल्या ताब्यातील टँकरवरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रेलर जाऊन रस्त्याच्या मध्येच असलेल्या दुभाजकावर धडकून पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. यावेळी टँकर दुभाजकावर आदळून महाड बाजूकडे जाणाऱ्या मार्गिकेवर पलटी झाला होता. सुदैवाने यावेळी दुसरे कोणतेही वाहन या मार्गिकेवरुन जात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात टँकरचा पुढील भाग संपूर्णपणे चेपला जाऊन यामध्ये टँकर चालक बराच काळ अडकला होता. यावेळी हायड्राच्या सहायाने स्थानिकांच्या व महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मदतीने चालकास बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले मात्र चालकाला बाहेर काढता आले नाही. त्यामुळे तात्काळ कोलाड येथील जीवरक्षक सह्याद्री रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले. यानंतर रेस्क्यू टीममधील सदस्यांच्या अथक प्रयत्नानंतर केबिनमध्ये अडकून पडलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आले. या अपघातात चालक नितीन कुमार यांच्या हात व पायांना अति गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्याने जखमी झाल्याने त्याच्यावर सुकेळी येथील जिंदाल रुग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले.
दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्यासह कर्मचारी तसेच सहा. पोलीस निरीक्षक गितांजली जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग मदत केंद्र ऐनघर व वाकण चौकी येथील वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. तर या अपघाताची माहिती मिळताच सुकेळी येथील जिंदाल स्टील कंपनीतील अग्निशमन दल अपघातस्थळी उपस्थित झाले होते. सुकेळी खिंडीच्या खैरवाडी गावासमोरील उतारावर त्याच ठिकाणी याआधीही अशाच प्रकारच्या तीन अपघातांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबंधित ठेकेदाराने वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या ठिकाणी लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना कराव्यात आणि यासाठी नागोठणे पोलीस, महामार्ग पोलीस यांनी रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाठपुरावा करून वारंवार घडणारे अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना वजा मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. या अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
अवजड वाहनांना बंदी असताना देखील महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ
होली व धुलीवंदन सणासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणात कोकणातील आपल्या गावी आले होते तसेच या सणांना लागून शनिवार व रविवार आल्याने पर्यटन कोकणातील पर्यटन दाखल झाले होते. कोकणवासीय चाकरमानी व पर्यटक रविवारी परतणार असल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढून वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रविवारी दि.१६ रोजी मुंबई गोवा महामार्गावर दुपारी १२ ते रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली असल्याचे रायगडचे जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी जाहीर करत याबाबतचे आदेश पारित केले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या अवजड वाहनांच्या बंदीच्या आदेश धुडकावून रविवारी मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वर्दळ असल्याचे पहावयास मिळाले. पण मग जिल्हाधिकाऱ्यांचे महामार्गावर रविवारी अवजड वाहनांना बंदीचे आदेश असतानाही महामार्गावर लोखंडी कॉईल वाहतूक करणाऱ्या ट्रेलरसह विविध प्रकारच्या अवजड वाहनांची वाहतूक कोणाच्या आशिर्वादाने सुरु होती तेदेखील महामार्गावर जागोजागी वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी असताना हे कोडे उलगडले गरजेचे आहे.