सुकेळी येथिल जिंदल कंपनी समोर बर्निंग कारचा थरार
कार पुर्णपणे जळुन खाक : सुदैवाने जीवितहानी टळली

सुकेळी येथिल जिंदल कंपनी समोर बर्निंग कारचा थरार !
कार पुर्णपणे जळुन खाक : सुदैवाने जीवितहानी टळली
दिनेश ठमके
सुकेळी : कोकणातील महत्त्वाचा अशा मानल्या जाणाऱ्या होळीच्या सणानिमित्त अनेक कोकणवासिय कोकणात आपल्या गावी जात असल्यामुळे सद्यस्थितीत महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी सुरू असतांनाच मुंबई – गोवा महामार्गावरील सुकेळी येथिल जिंदल कंपनीच्या समोरच राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर बुधवारी (दि. १२) मार्च रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बर्निंग कारचा थरार पहावयास मिळाला. चालत्या कारने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण कार जळुन खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार मारुती वॅगनार कार चालक देविदास अनंत डोंगरे रा. अंधेरी हे आपल्या ताब्यातील कार मध्ये सोबत शुभम संतोष तेली रा.पनवेल व रोहीत तेली रा. कल्याण यांच्यासह होळी सणानिमित्त आपल्या कणकवली या गावी जात असतांना नागोठणेच्या पुढे सुकेळी येथिल जिंदल कंपनीच्या समोर कार आली असता अचानक इंजिन मधुन धुर आल्याचे चालक देविदास डोंगरे यांच्या लक्षात येताच त्यांनी रस्त्याच्या डाव्या बाजूला रस्त्यावर कार उभी केली व कार मधील तिघेही जेवढं सामान हातात भेटेले तेवढे घेऊन कारच्या बाहेर पडले व काही क्षणातच कारने मोठ्या प्रमाणात पेट घेतला. सर्वत्र धुराचे लोट पसरले होते.
यावेळी महामार्गावरील वाकण टॅबचे महामार्ग पोलिस संदिप घासे व जनार्दन मेंगाळ यांनी तत्काळ जिंदल कंपनीच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाचे अच्युतानंद , सिक्युरिटी हेड गुलाब सिंग तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन कांहीं क्षणातच आग आटोक्यात आणली पंरतु सी. एन. जी. कार असल्याने मोठ्या प्रमाणात पेट घेतल्यामुळे संपुर्ण कार जळुन खाक झाली .या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन काही प्रमाणात सामान देखिल जळुन खाक झाले .दरम्यान यावेळी वाकण टॅबचे पो. ह. समीर पवार, काशिनाथ नागे, राजु खाडंवी, अनिल पाटील यांनी वाहतुक सुरक्षित अंतरावर थांबवुन आग विझल्यावर वाहतूक पुर्ववत सुरू करण्यात आली. या अपघाताचा पुढील तपास नागोठणे पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी करीत आहेत.