कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण

श्रेयस धनंजय धारप यांची दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड

श्रेयस धनंजय धारप यांची दिवाणी  न्यायाधीश म्हणून निवड

महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ या लेखी परिक्षेचा निकाल नुकताच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यामध्ये पाली व रोहा न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. श्री. धनंजय धारप यांचे सुपुत्र श्रेयस धनंजय धारप यांची मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे. 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी तथा दिवाणी न्यायाधीश या परीक्षेच्या निवड प्रक्रियेचा भाग असलेली प्रत्यक्ष मुलाखत नुकतीच मुंबई येथे  घेण्यात आली. श्रेयस धनंजय धारप यांनी पुणे येथील आय. एल. एस. लॉ कॉलेज मधून २०२२ मध्ये  कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी दिवाणी न्यायाधीश व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर,  २०२३ मध्ये संभाजी नगर येथे झालेली पूर्व परीक्षा व ऑगस्ट २०२४ मध्ये संभाजी नगर येथेच झालेली मुख्य परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यानंतर मुंबईतील माझगाव कोर्ट येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांच्याकडून घेण्यात आलेल्या मुलाखतीचा अंतिम टप्पाही श्रेयस धारप यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. थोड्याच दिवसांत श्रेयस धारप यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. 
सातत्यपूर्ण अभ्यास,  कठोर मेहनत तसेच आपले वडील व ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय धारप यांचे मार्गदर्शन याच्या जोरावर श्रेयस धनंजय धारप यांनी पहिल्याच प्रयत्नात व वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी हे यश मिळविले आहे. श्रेयस धारप यांच्या या यशाबद्दल रोहा व पाली या दोन्ही न्यायालयातील वकील वर्गातून तसेच रोहा व  सुधागड या दोन्ही तालुक्यातील नागरिकांतून श्रेयस धारप यांचे अभिनंदन होत आहे.
रोहा वकील संघटनेकडून श्रेयस धारप यांचा होणार सत्कार 
श्रेयस धनंजय धारप यांनी दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परिक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल रोहा वकील संघटनेकडून श्रेयस धारप यांचा बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी सत्कार करण्यात येणार असल्याचे रोहा वकील संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ विधिज्ञ एन. जी. देशमुख यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!