Uncategorizedमहाराष्ट्र ग्रामीणशैक्षणिक

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी “समता पंधरवडा” विशेष मोहिम

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन 

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी “समता पंधरवडा” विशेष मोहिम

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन 

महेश पवार 
नागोठणे : महाराष्ट्र शासनाच्या  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. इयत्ता ११ वी व इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या तसेच अभियांत्रिकी पदविका, पदवी अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्याने अनेकदा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची परिस्थिती उद्भवते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर असा बिकट प्रसंग येऊ नये व त्यांना वेळेत जात वैधता प्रमाणपत्र मिळावे याकरिता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर  यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १ एप्रिल  ते १५ एप्रिल २०२५ या कालावधीत “समता पंधरवडा” ही विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.
जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा, तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेला नाही अशा विद्यार्थ्यांनी ज्या जिल्ह्यातून जात प्रमाणपत्र मिळविले आहे त्या जिल्ह्याच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी त्वरित अर्ज करावेत असे या विशेष मोहिमेत संधी देण्यात आली आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी जात पडताळणीसाठी समितीकडे अर्ज केला आहे मात्र जात पडताळणी अर्जात त्रुटी असल्याने ज्यांना जात वैधता  प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी त्रुटी दूर करण्यासाठी जातपडताळणी कार्यालयात येण्यास सांगण्यात आले आहे. 
त्यामुळे या संधीचा लाभ आपल्या रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनीही घ्यावा असे आवाहन उपायुक्त तथा रायगड जिल्हा जातपडताळणी समितीचे सदस्य जयंत चाचरकर यांनी केले आहे अशी माहिती जिल्हा जातपडताळणी कार्यालयातील अधिक्षक योगेश थनगे यांनी दिली. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!