
कॅन्सर तपासणी व्हॅन शनिवारी नागोठण्यात
महिलांनी तपासणी करण्याचे आवाहन
महेश पवार
नागोठणे : महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत व रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा विभागाच्या वतीने शनिवार दि. १२ एप्रिल रोजी कॅन्सर तपासणी व्हॅन नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध केली जाणार आहे. त्यामुळे या कॅन्सर तपासणी व्हॅन मधील शिबिरात नागोठणे शहर व परिसरातील महिलांनी सहभागी होऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सौ. सुप्रियाताई संजय महाडिक व ग्रामसेवक राकेश टेमघरे यांनी केले आहे.
रायगडचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशानुसार होणाऱ्या या कॅन्सर तपासणी व्हॅन मधील शिबिरात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. आजाराविषयी सहसा कुणीही स्वतःहून तपासणी करण्यासाठी दवाखान्यात जात नाही. त्यामुळे लक्षणे असली तरी समजून येत नसल्याने आजार बळावतो. त्यामुळे आजार होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी, आजार आटोक्यात राहण्यासाठी वेळीच उपचार करून घेणे शक्य व्हावे यासाठी राज्य शासनाने कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅन मधून या तपासणी दौऱ्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे नागोठणे शहरातील सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला मंडळ, महिला बचत गट मधील सर्व महिलांनी आपली प्राथमिक तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे उपस्थित राहून तपासणी करून घेण्यास सांगण्यात आले आहे.