अपघातमहाराष्ट्र ग्रामीण

महापारेषणच्या कानसई येथील सब स्टेशनमध्ये अग्नितांडव

लाखो रुपयांचे नुकसान

महापारेषणच्या कानसई येथील सब स्टेशनमध्ये अग्नितांडव

लाखो रुपयांचे नुकसान
दिनेश ठमके
सुकेळी : नागोठण्याजवळील कानसई येथील  ४०० केव्ही क्षमता असलेल्या सब स्टेशनमध्ये  बुधवारी ( दि.२) रोजी  दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली. यावेळी येथे बाजुला असलेल्या आॅईलमुळे काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले त्यामुळे सबस्टेशनमध्ये अग्नितांडव पहावयास मिळाले.. दरम्यान यावेळी सबस्टेशनच्या समोरच असलेल्या प्राथमिक शाळेच्या आसपास स्फोट  झाल्यामुळे स्फोटातील काही जळाऊ आगीचे गोळे  शाळेच्या परिसरात  उडुन आल्यामुळे त्या ठिकाणी शाळेच्या आजुभोवती  सुकलेले गवत असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणात  पसरत गेली.  शाळेमध्ये पेपर सुरू असतांनाच ही आग  पसरत गेल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले व सर्वांची एकच तारांबळ उडाली. यावेळी येथिल स्थानिक नागरिकांनी लगेचच त्या ठिकाणी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
दरम्यान घटना स्थळावरून जवळच असलेल्या जिंदल कंपनीच्या अग्निशामक दलाला तातडीने  पाचारण करण्यात आले. तात्काळ जिंदाल कंपनीचे अग्निशामक दलाचे कर्मचारी प्रज्वल सकपाळ व अच्युतानंद तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली. पंरतु वातावरणातील वाढलेल्या प्रचंड उष्णतेमुळे पुन्हा आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे पुन्हा अग्निशामक दलाला पाचारण करुन आग विझविण्यात आली. या आगीत सब स्टेशनचे  मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 
कानसई येथील सब स्टेशनमध्ये गेल्या काही वर्षात वारंवार आग लागण्याच्या घटना घडल्या  आहेत.  या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही महापारेषणचे वरिष्ठ अधिकारी उपाययोजना करण्यासाठी उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याबाबतीत लवकरात लवकर योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा येथील स्थानिक नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना महापारेषणला दिला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!