कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे पोलिस ठाणे झाले स्मार्ट !
जिल्हा पोलिस मुख्यालयात प्रमाणपत्र देऊन सन्मान

नागोठणे पोलिस ठाणे झाले स्मार्ट !
जिल्हा पोलिस मुख्यालयात प्रमाणपत्र देऊन सन्मान
सपोनि सचिन कुलकर्णी व टीमचे सर्वत्र अभिनंदन
महेश पवार
नागोठणे : पोलिस ठाण्यात येणाऱ्या तक्रारदार व इतर नागरिक यांना सर्वोत्तम सेवा व सुविधा प्रदान करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पोलिस ठाण्याला स्मार्ट पोलिस ठाणे म्हणून गौरव करण्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक १९ एप्रिल रोजी रायगड पोलिसांच्या अलिबाग येथील मुख्यालयात संपन्न झाला. यामध्ये सर्वोत्तम सेवा व कामगिरीसाठी असलेला ISO 9001:2015 नुसार “A++” हा मानाचा दर्जा नागोठणे पोलिस ठाण्याला देण्यात आला.

नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि सचिन कुलकर्णी यांनी नागोठणे पोलिस ठाण्याला मिळालेला सन्मानपत्राच्या स्वरूपातील हा पुरस्कार जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते व अप्पर पोलिस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या येथील जागेत अनेक वर्षे नागोठणे पोलिस ठाण्याचा कारभार चालला होता. मात्र जुन्या दगडी बांधकाम आलेल्या पोलिस ठाण्याच्या मूळ जागेवर काही वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्याच्या इमारतीला २०२३ मध्ये मूर्त स्वरूप आले. आणि रायगडचे तत्कालीन पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते २७ डिसेंबर, २०२३ रोजी नागोठणे पोलिस ठाण्याच्या या प्रशासकीय सुसज्ज नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न झाले होते. मात्र असे असले तरी घाईघाईत उद्घाटन झालेल्या नागोठणे पोलिस ठाण्याच्या या इमारती मध्ये आय. एस. ओ मानांकन देणाऱ्या समितीने एकूण ३७ सुधारणा करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार नागोठणे पोलीस ठाण्यात एकूण ३७ सुधारणा करण्यात आल्या असून सर्व ठिकाणी सूचना फलक लावण्यात आले आहेत. अभ्यागत कक्ष तयार करण्यात आला असून बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.

तक्रारदार यांचे साठी व्हिजीटर बुक ठेवण्यात आले आहे. तक्रारदार यांचेसाठी पिण्याचे पाणी व्यवस्था, बाथरूम तसेच सुसज्ज प्रतीक्षालय बनवण्यात आले आहे. अशाप्रकारे नागोठणे पोलीस ठाण्याचे स्वरूप पूर्णतः बदलून टाकण्यात आलेले आहे. या सर्व निकषांच्या आधारावर तसेच पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीने उपरोक्त पुरस्कार नागोठणे पोलीस ठाण्याला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी व त्यांच्या संपूर्ण टीमचे नागोठणे शहरासह विभागातील सर्व गावातून कौतुक व अभिनंदन होत आहे.