आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची वाढती दहशत
शहरातील विविध भागात लहान मुलांसह सुमारे सतरा जणांवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

नागोठणे शहरात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याची वाढती दहशत
शहरातील विविध भागात लहान मुलांसह सुमारे सतरा जणांवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला
अनिल पवार
नागोठणे : संपूर्ण नागोठणे शहरात भटक्या मोकाट कुत्र्यांची दहशत गेली अनेक दिवसापासून वाढली असून हे भटके मोकाट कुत्रे शहरातील विविध भागात टोळक्याने मुक्त संचार करीत सर्वत्र हैदोस घातला आहे. त्यांच्या दहशतीने लहान मुले, वयोवृद्ध नागरीक तसेच लहान मुलांसह पालकही भयभीत झाले आहेत. असे असतानाच मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील विविध भागात फिरणाऱ्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने बुधवारी २३ एप्रिल रोजी दिवसभरात नागोठणे शहरातील विविध भागात दोन ते तीन लहान मुलांसह सुमारे सतरा जणांवर शहरातील पिसाळलेल्या भटक्या मोकाट कुत्र्याने जीवघेणा हल्ला करून चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरलं आहे.

नागोठणे शहरात गेली दोन ते तीन दिवसांपासून मोकाट पिसाळलेल्या अवस्थेत फिरत असलेल्या कुत्र्याने बुधवार (दि.२३) रोजी हिंसक रुप धारण केले असून बुधवारी दिवसभरात कोळीवाडा, रामनगर, मिरानगर, मोहल्ला परिसर, स्व. बाळासाहेब ठाकरे वसाहत शांतीनगर यांसह विविध भागात रस्त्यावरुन चालणाऱ्या तसेच दुचाकीवरून जाणाऱ्या सुमारे सोळा ते सतरा नागरिकांना चावा घेत धुमाकूळ घातला आहे. यामध्ये शहरातील विविध भागातील दोन ते तीन लहान मुलांचा समावेश आहे.
पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने चावा घेत जखमी केलेल्या या सर्वांवर नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले तर यातील काही गंभीर दुखापती झालेल्यांना अधिक उपचारार्थ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.– डॉ.आदित्य शिरसाट, वैद्यकीय अधिकारी – प्रा. आ. केंद्र नागोठणे
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली परीस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी येथील वनखात्याकडे त्या पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याला शोधून त्याला जेरबंद करण्यासाठी मदत मागितली मात्र वनखात्याकडे त्या पिसाळलेल्या कुत्र्याला जेरबंद करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध नसल्याने टेमघरे यांनी त्या कुत्र्याला पकडण्यासाठी गुरुवारी (दि.२४)शोध पथक तयार करून त्या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी संपूर्ण शहरात शोध मोहीम सुरू केली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत तरी पिसाळलेला मोकाट कुत्रा शोध पथकाचा हाती लागला नसल्याने शहरातील विविध भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम होते.

प्रशासनाने कायमस्वरूपी उपाय योजना करण्याची नागरिकांची मागणी
शहरात काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून बहुतेक कुत्र्यांना संसर्गजन्य रोग झाला आहे. नागोठणे शहरातील एस.टी. स्थानक,छ.शिवाजी महाराज चौक, कोळी वाडा, मच्छी व मटण मार्केट, खान मोहल्ला,उर्दू हायस्कूल, ग्रामपंचायत, पोस्ट कार्यालय, गांधी चौक, श्री जोगेश्वरी मंदिर परीसरासह चौका-चौकात टोळक्याने मोकाट कुत्री भटकताना दिसतात. रस्त्याने येणारे विद्यार्थी, वाटसरु,चारचाकी वाहनं तसेच मोटार सायकलस्वाराच्या अंगावर भुंकत धावून जातात. त्यावेळी घाबरलेल्या वाहन चालकांकडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.विशेषत: रात्रीच्या वेळी भुंकून हैराण करीत असलेल्या कुत्र्यांपासून वयोवृद्धांसह नागरीक भयभीत होत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील काही परिसरातील हे भटके कुत्रे तर लहान मुलांना लक्ष्य करीत असून नागरिकांच्याही अंगावर धावून जात असतात.तर काही वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने शहरातील विविध भागात लहान मुलांसह नागरिकांवर जीवघेणे हल्ले करून चावे काढले होते. अशा परिस्थितीत शहरातील विविध भागातील या मोकाट कुत्र्यांपासून एखादा मोठा अनर्थ होण्याआगोदरच त्यांचा ग्रामपंचायत प्रशासन तसेच संबधित खात्याकडून बदोबस्त करुन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची सार्थ मागणी नागरिकांकडून होत आहे.
शहरातील पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याला पकडण्यासाठी शोध पथक तयार केले असून शहरात शोध मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे लागलीच तत्परतेने त्याचा बंदोबस्त करण्यात येईल. पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यासह शहरातील इतर कुत्र्यांचा बदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे.दरम्यान सर्वानी आपली काळजी घ्यावी. विशेषत लहान मुलांना घराबाहेर पाठवू नका.तसेच सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, आपल्या घरातील शिल्लक राहिलेले अन्न पदार्थ रस्त्यावर किंवा भटक्या कुत्र्यांना घालू नये. त्याना आयत्या अन्नाची त्यांना सवय झाली असून, या भटक्या कुत्र्यांना एखादेवेळी अन्न मिळत नाही तेव्हा ते रागाने समोर जो दिसेल त्याला चावण्यास बघतात. अशावेळी नागरिकांनी भयभीत न होता असा कुत्र्यांपासून सावध राहावे.याचबरोबर जर कुत्रा चावल्यास तातडीने दवाखान्यात जाऊन वेळीच औषोधोपचार करावे.– सुप्रिया महाडिक, सरपंच ग्रामपंचायत, नागोठणे
रेबीज कुत्रा गावात फिरत आहे. कुत्रा कुणास चावल्यास त्यासाठी त्या व्यक्तीस Rabies vaccine आणि Antirabies serum आणि inj.T.T.एवढी इंजेक्शन घेणे जरुरी आहे. हे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिळतील याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर कुत्र्याचा बंदोबस्त करावा. सर्वांनी काळजी घ्या.– डॉ. सुनील पाटील, मायालक्ष्मी मॅटर्निटी नर्सिंग होम