धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा १३ एप्रिलला
उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी चंद्रकांत ताडकर

नागोठण्याची ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचा पालखी सोहळा १३ एप्रिलला
उत्सव समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर : अध्यक्षपदी चंद्रकांत ताडकर
महेश पवार
नागोठणे : नागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता व भैरवनाथ महाराजांचा चैत्र पालखी सोहळा रविवार दि. १३ एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सर्व ग्रामस्थांना व भाविकांना श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन आपल्या घराजवळ होणार आहे. त्यामुळे समस्त नागोठणेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान श्री जोगेश्वरी माता मंदिरात गुढीपाडवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या पालखीच्या नियोजनाच्या संदर्भातील बैठकीत श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीने ३ वर्षांची मुदत यशस्वीपणे पूर्ण केल्याने नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी तीन वर्षांपूर्वी बैठकीत ठरल्याप्रमाणे मुरावाडी येथील चंद्रकांत ताडकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आल्याचे देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ यांनी जाहीर केले. तर उपाध्यक्षपदी संतोष चितळकर, सचिवपदी विवेक देशपांडे, खजिनदारपदी जितू कजबजे, सहसचिव अनिल पवार, सह खजिनदार सतीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्सव समितीच्या कार्यकारिणीत सदस्य म्हणून खडक आळीतील विशाल खंडागळे, संतोष सकपाळ, आंगर आळीतील पंकज कामथे, अल्विन नाकते, कुंभार आळीतील रोहिदास हातनोलकर, प्रफुल नागोठणेकर, मराठा आळीतील अनंत चितळकर, कोळीवाडा मधून बाबू कोळी, पांडुरंग कोळी, राज पाटील, गवळ आळीतील संतोष पाटील, संजय पाटील, बंगले आळीतील ऋषिकेश भोय, दिगंबर खराडे, रामनगर मधून प्रशांत पानकर, जोगेश्वरी नगर मधून हितेश भोय, मच्छिंद्र साळुंखे, प्रभू आळीतील राजेंद्र गुरव, मुरावाडी मधून घन:श्याम ताडकर आदींचा समावेश करण्यात आला आहे.

श्री जोगेश्वरी माता मंदिरात संपन्न झालेल्या या बैठकीला श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, सचिव भाई टके, हरेश काळे, विलास चौलकर, बाळासाहेब टके, बाळा पोटे, देवीचे भक्त मधुकर पोवळे, अशोक गुरव, श्री जोगेश्वरी माता देवस्थान उत्सव समितीचे नवीन अध्यक्ष चंद्रकांत ताडकर, माजी अध्यक्ष नितीन राऊत, विठ्ठल खंडागळे, ग्रा. पं.सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सचिन ठोंबरे, संतोष नागोठणेकर, उदंड रावकर, सुरेश गिजे, सुनील लाड, दिनेश घाग, रुपेश नागोठणेकर, मंगेश कामथे, प्रथमेश काळे, पांडुरंग कामथे, संतोष जोशी, राजेश पिंपळे, विनोद अंबाडे, किसन भोय, शंकर भालेकर, प्रमोद चोगले, पिंट्या रटाटे, निलेश भोपी आदींसह ग्रामस्थ यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांनी यावेळी पालखी नियोजनाच्या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी माजी खजिनदार मंगेश कामथे यांनी हिशोब सादर केला त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच मावळत्या उत्सव समितीने तीन वर्षे केलेल्या चांगले कार्याबद्दल त्यांचा आणि नवीन उत्सव समितीचा यावेळी विश्वस्त समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
ग्रामदेवतांच्या पालखी सोहळ्यासाठी चाकरमानी, माहेरवासीन तसेच सगेसोयरे, पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने नागोठण्यात येत असतात. त्यामुळे पालखी सोहळा भक्तिमय व आनंदी वातावरणात संपन्न होण्यासाठी उपस्थित ग्रामस्थांनी अनेक सुचना केल्या. ग्रामदेवतांचा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी उत्सव समितीला सर्वाधिकार देण्यात आले असून पालखी सोहळ्यात कोणताही वाद न करता उत्सव समितीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
श्री जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने मंदिराची रंगरंगोटी पूर्ण होईल : नरेंद्रशेठ जैननागोठण्याची आराध्य ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या रंगरंगोटी व इतर किरकोळ दुरुस्तीसाठी सुमारे ८ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. उत्सव समितीकडून मिळणारी शिल्लक रक्कम व दानपेटीतील रक्कम मिळूनही दोन अडीच लाख रुपयेच आपल्याकडे शिल्लक आहेत. मात्र असे तरी श्री जोगेश्वरी मातेच्या आशीर्वादाने व दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने ही आर्थिक अडचण दूर होईल असा विश्वास यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी बैठकीत व्यक्त केला.