
नागोठण्यात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न
पालखी सोहळ्याने सर्वत्र आनंद
महेश पवार
नागोठणे : नागोठणे शहरातील आंगर आळीतील श्री हनुमान मंदिरात, के. एम. जी. विभागातील श्री हनुमान मंदिरात तसेच नागोठण्यातील आणि परिसरातील सर्वच हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त सर्वत्र पालखी सोहळे आयोजित करण्यात आले होते.

नागोठण्यातील आंगर आळीतील श्री हनुमान मंदिरातील या श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची सुरुवात मंदिरात सकाळी ७ वाजता श्री. पांडुरंग जाधव, सौ. प्राजक्त पांडुरंग जाधव यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करून करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता वाजत, गाजत, नाचत हा पालखी सोहळा सुरू करण्यात आला. तदनंतर आंगर आळीत सर्वत्र हा पालखी सोहळा फिरविण्यात आला. या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांसह, अबाल वृद्ध, माहेरवाशिणी व तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती. पालखी आपल्या घरासमोर येणार असल्याने महिलांनी सर्वत्र रांगोळ्या काढल्या होत्या तसेच सर्वत्र आकर्षक सजावट करण्यात आली होती. नंतर हा पालखी सोहळा आंगर आळीतील श्री हनुमान मंदिरात रात्री ११ वाजता पोचल्यानंतर महाआरती घेण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने या पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली. आंगर आळीतील हा पालखी सोहळा यशस्वी होण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांनी अपार मेहनत घेतली.