धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन

नागोठण्यात श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील कुंभारआळी येथील श्री गणपती – हनुमान मंदिरात कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांची पुण्यतिथी सोहळा श्री संत अलिबागकर महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शनिवार दि. २६ एप्रिल रोजी कुंभार समाज बांधवांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांनी आयोजित करण्यात आला आहे.
शनिवारी पहाटे ५ वा. उन्नती महिला मंडळ व ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्याकडून काकड आरतीने संत गोरोबा काका पुण्यतिथी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. नंतर सकाळी ८ ते ९ वाजण्याच्या दरम्यान कुंभार आळी ग्रामस्थांकडून कळस स्थापना, सकाळी ९ वा. पुण्यतिथी सोहळ्या निमित्त दिंडी सोहळा, सकाळी ९ ते १० वाजता नागोठण्यातील संत सेवा मंडळाचे भजन नंतर दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास संत गोरोबा काका यांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. याचबरोबर संत गोरोबा काका यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुंभारआळी ग्रामस्थांच्या वतीने दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायणाच्या महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सायंकाळी ५ ते ६ वा. गायक प्रफुल्ल नागोठणेकर व तबलजी कौस्तुभ दिवेकर व सहकाऱ्यांचे श्री स्वामी समर्थ प्रासादिक भजन मंडळ, नागोठणे यांचे संगीत भजन, सायंकाळी ६ ते ७ वा. वरप (ता. पेण) येथील ह.भ.प. भगवान कदम यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तसेवा हरिपाठ मंडळाचे हरिपाठ होणार आहे.
यानिमित्त रात्री ८ वा. ग्रामस्थ मंडळ कुंभारआळी यांच्या वतीने महाप्रसाद ठेवण्यात आला आहे. शेवटी रात्री १० वा. राजिपचे सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शरद वाडेकर यांच्या वतीने खोपोली येथील किर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य किर्तननाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत शिरोमणी गोरोबा काका यांचा पुण्यतिथी सोहळा यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थ मंडळ व उन्नती महिला मंडळ मेहनत घेत आहेत.