नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांचा उरूस उत्साहात संपन्न
उरूस मध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन

नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांचा उरूस उत्साहात संपन्न
उरूस मध्ये हिंदू मुस्लिम बांधवांच्या ऐक्याचे दर्शन
दोन दिवसांत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांच्या दर्ग्यात १९३ वा उरूस शरीफ दोन दिवस १५ व १६ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला. हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या या उरूस मध्ये मुस्लिम बांधवांसह अनेक हिंदू बांधवांनी दर्ग्यात येऊन दर्शन घेतले. या उरूसच्या पहिल्या दिवशी सायंकाळी मोहल्ल्यातून दर्ग्यापर्यंत संदल मिरवणूक काढण्यात आली.
पहिल्या दिवशी उरूस मध्ये नागोठणे शहरासह परिसरातील नागरिकांसह जिल्ह्यातील मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. या दोन दिवसांच्या उरूस मध्ये थाटलेल्या विविध प्रकारच्या दुकानांतून तसेच इतर खेळाच्या साहित्याचे व्यवसायातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली.
हजरत मीरा मोहिद्दीन शाह बाबांच्या उरुसाच्या निमिताने दर्गा व परिसरात मोठ्या प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विविध खाद्य पदार्थांची दुकाने, सुकविलेली मासळी, औषधी असलेला सफेद कांदा, खेळण्याची दुकाने, शो केस मध्ये ठेवल्या जाणाऱ्या विविध वस्तू यांसह घरात लागणाऱ्या गरजेच्या सर्व वस्तू उरूस मध्ये स्वस्त व वाजवी दरात मिळत असल्याने आदिवासी बांधवांपासून, गरीब, मध्यमवर्गीय ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वच जण या उरूसमध्ये खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे दर्गा परिसर दोन दिवस गर्दीने फुलून गेला होता.
उरूसच्या दुसऱ्या दिवशी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आयोजित केलेला प्रसिद्ध कव्वाल गुलाम वारीस व रुबी ताज यांच्यामध्ये कव्वालीचा सामना चांगलाच रंगला. या कव्वालीच्या सामन्या दरम्यान
विविध राजकीय पक्षाच्या नेतेमंडळीसह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली तसेच दर्ग्याचे दर्शन घेतले. नागोठण्यातील हा दोन दिवसांचा उरूस शांततेत व उत्साही वातावरणात यशस्वी होण्यासाठी नागोठणे उरूस कमिटीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मेहनत घेतली. नागोठण्यातील दोन दिवसांच्या या उरूस दरम्यान रोहाचे उप विभागीय पोलिस अधिकारी रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नागोठणे पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.