खेळमहाराष्ट्र ग्रामीण
पिंच्याक सिलाट राष्ट्रीय स्पर्धेत नेहा दोरे हिला सुवर्ण पदक
नेहाला दहावीच्या परीक्षेत मिळाले ८८ टक्के गुण

पिंच्याक सिलाट राष्ट्रीय स्पर्धेत नेहा दोरे हिला सुवर्ण पदक
नेहाला दहावीच्या परीक्षेत मिळाले ८८ टक्के गुण
महेश पवार
नागोठणे : खेलो इंडिया अस्मिता पिंच्याक सिलाट वूमन्स लीग राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने महाराष्ट्र पिंच्याक सिलाट असोसिएशनने कोपरखैरणे – नवीमुंबई येथील क्रिस्ट अकॅडमी येथे १ मे ते ४ मे रोजी करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील नागोठण्याची खेळाडू कुमारी. नेहा हिरामण दोरे हिने महाराष्ट्र संघाकडून खेळताना ७५ ते ८० किलो वजन गटात विरोधी राज्यांच्या खेळाडूंचा पराभव करत सुवर्णपदक जिंकून रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे कुमारी नेहा हिचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
या स्पर्धेमध्ये ३० राज्यातील एकूण ३६४ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच उद्घाटन व बक्षीस वितरण खासदार नरेश म्हस्के, राष्ट्रीय पिंच्याक सिलाट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, फादर जेसन क्रिस्ट अकॅडमी यांच्या हस्ते पार पडले.
पिंच्याक सिलाट हा खेळ इंडोनेशिया मार्शल आर्ट प्रकारचा खेळ असून यामध्ये सोलो, टँडींग(फाईट ), गंडा, रेगू (ग्रूप इव्हेंट), तुंगल (सिंगल इव्हेंट)अशा पाच प्रकारामध्ये खेळला जातो. नेहा ही नागोठणे येथे सुपर डायमंड मार्शल आर्टचे मास्टर धनंजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे अशी माहिती रायगड पिंच्याक सिलाट असोसिएशनचे अध्यक्ष रुपेश जाधव यांनी दिली.

नेहाला दहावीत मिळाले ८८ टक्के गुण
मूळची बोरीचा माळ, वरप (ता.पेण) येथील खेळाडू व सध्या वरवठणे(नागोठणे) येथे कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेल्या कुमारी नेहा हिचे
नागोठण्यातील राजिप कन्याशाळेत इयत्ता दुसरी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर तिने इयत्ता तिसरीमध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या शाळेत प्रवेश घेतला. वडील हिरामण दोरे जिल्हा परिषदेच्या ऐनघर येथील शाळेत शिक्षक व आई हर्षदा दोरे अंगणवाडी पर्यवेक्षिका असल्याने योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यास यामुळें नेहा हिला यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के गुण मिळाले आहेत. लहानपासूनच खेळाची आवड असलेल्या नेहाच्या वडिलांनी तिला इयत्ता सातवीत नागोठण्यातील सुपर डायमंड मार्शल आर्टचे मास्टर धनंजय जगताप यांच्याकडे पिंच्याक सिलाटच्या प्रशिक्षणासाठी पाठविली. धनंजय जगताप यांचे अचूक मार्गदर्शन व तिच्या प्रशिक्षणावर घेतलेली मेहनत यामुळे या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपल्या रायगड जिल्ह्यातील नेहा हिने चमकदार कामगिरी केली आहे. यापूर्वी मास्टर धनंजय जगताप व मास्टर अनुज सरनाईक यांनी २०२४ पर्यंत प्रत्येक राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे.
नेहा मधील अष्टपैलू गुण असून ती एक बिनधास्त मुलगी आहे. जंगल, डोंगर कपारीतू ती आमच्यासोबत बिनधास्तपणे चालत असते. आम्ही आदिवासी ठाकूर समाजाचे असल्याने नेहाचे आपल्या मायबोलीसह मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. तिला दहावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात ९२ गुण मिळाले आहेत. तिचे वक्तृत्वही चांगले असून आयत्या वेळच्या विषयावर, मग तो कोणताही विषय असूद्या ती उत्तम बोलू शकते. शालेय वक्तृत्व स्पर्धेत तिने ८ वी ते १२ वी पर्यंतच्या गटात सतत चार वर्षे प्रथम क्रमांक मिळविला असून भविष्यात तिला महाराष्ट्र व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला सामोरे जाऊन सनदी अधिकारी व्हायचे आल्याचे तिचे वडील हिरामण दोरे यांनी सांगितले.