महाराष्ट्र ग्रामीण

आदिवासींच्या रस्ता पाण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने केले जल समाधी आंदोलन

रा.जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकामांच्या अभियंत्यांसह ठेकेदारांवर कारवाईची मागणी

आदिवासींच्या रस्ता पाण्यासाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेने केले जल समाधी आंदोलन

रा.जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा व सार्वजनिक बांधकामांच्या अभियंत्यांसह ठेकेदारांवर कारवाईची मागणी
नागोठणे : भारत देश महासत्ता झाल्याच्या मोठमोठ्या बाता मारणारी सरकारी यंत्रणा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षानंतरही आदिवासी बांधवांना रस्ते, पाण्यासारख्या मूलभूत सुविधा देऊ शकली नसल्याचे वास्तव वारंवार समोर येत आहे. पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी आदिवासी वाडीच्या निमित्ताने हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. ग्रुप ग्रामपंचायत आंबिवली हद्दीतील माळवाडी या आदिवासी वाडीला आजपर्यंत पिण्याच्या शुद्ध पाण्यासह रस्ता देखील नाही. वाडीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने येथील आदिवासी भगिनींना कधी दोन किलोमीटरवर असलेल्या शितोले वाडीतील दूषित तलावातील तर कधी पहाटे तीन वाजता उठून जंगलात सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खड्ड्यातून हंडाभर पाण्यासाठी मोलमजुरी सोडून पायपीट करावी लागत आहे. या मालवाडीतील आदिवासींची व्यथा इथेच संपत नाही तर या वाडीला आजही रस्ता नसल्याने वाडीच्या विकासाचा मार्गच जणू थांबला आहे. सुमारे दोनशे च्या आसपास लोकसंख्या असलेल्या या माळवाडीसाठी दोन वर्षांपूर्वी जल जीवन मिशन योजनेतून सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांची योजना मंजूर अलिबाग येथील सुधाकर पाटील यांना ठेका देण्यात आला तर रस्त्यासाठी आता महिन्यांपूर्वी पेण येथील रामेश्वर कन्स्ट्रक्शन यांना ठेका देण्यात आला परंतु दोन्ही विकास कामे पूर्ण न केल्यामुळे मालवाडीतील आदिवासींवर मात्र रस्ता, पाण्यासाठी जल समाधी घेण्याची वेळ आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की माळवाडीच्या पाणी प्रश्नावर तोडगा म्हणून जल जीवन मिशन योजनेतून अलिबाग तालुक्यातील चाळमाळा येथील सतीश सुधाकर घरत या ठेकेदाराला डिसेंबर, २०२३ मध्ये सुमारे पंचेचाळीस लाख रुपयांचा ठेका देण्यात आला होता.  सदर काम बारा महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना आजही हे काम अर्धवट आहे.  विशेष म्हणजे सदर योजनेचे काम सुरू असताना ठेकेदार, सरपंच किंवा ग्रामसेवक एकदाही वाडीत फिरकले नसल्याचे संतप्त आदिवासी भगिनींनी सांगितले असून पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत ५० टक्केही काम पूर्ण झाले नसल्याचे येथील आदिवासी बांधव सांगतात याबाबत पाणीपुरवठा विभागाचे अभियंते, गट विकास अधिकारी व पेण तहसीलदारांना वारंवार सांगून देखील कोणतीही उपाययोजना न केल्यामुळेच आमच्यावर पाणीटंचाईचे संकट ओढावल्याचा आरोप आदिवासी भगिनींनी केला आहे. तर दुसरीकडे ह्याच वाडीच्या रस्त्यासाठी दिनांक १९/०९/२०२४ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग पेण यांचेकडून माळवाडीच्या रस्त्याच्या कामाचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देऊन काम पूर्ण करण्याची मुदत (सहा महीने) संपली तरी रस्त्याचे काम सुरू झाले नाही.
वाडीला रस्ता नसल्यामुळे नुकताच मालवाडीतील एक गर्भवती महिला प्रसूतीसाठी वेळेवर रुग्णालयात न पोहोचल्यामुळे तिच्या पोटातील बाळ दगावले असल्याचे आदिवासी महिलांनी सांगितले आहे. यास सार्वजनिक बांधकाम विभाग पेणचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता आणि या रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर घेऊन काम न करणारे ठेकेदार जबाबदार आहेत म्हणून संबंधितांवर  कारवाई करून मालवाडीला पिण्याचे शुद्ध पाणी आणि रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी मंगळवार दिनांक १३ मे २०२५ रोजी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पेण येथील भोगावती नदी पात्रात जल समाधी आंदोलन करण्यात आले.
सुरुवातीला या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणा-या प्रशासकीय यंत्रणेची मात्र संतोष ठाकूर यांचा आदिवासी बांधव नदीपात्रात उतरल्यानंतर धावपळ उडाली व पेण चे तहसीलदार तानाजी शेजाळ, पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अविनाश घरत, रायगड जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे उपअभियंता रवी पाचपोर, रमेश राठोड, सार्वजनिक बांधकाम विभाग पेण चे अभियंता दामोदर पाटील यांनी आंदोलनस्थळी धाव घेत सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, नंदा म्हात्रे व इतर आंदोलनकर्त्यांशी तहसीलदार तानाजी शेजाळ यांनी पुढील दोन दिवसात मालवाडीला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल तसेच १६ मे पासून माळवाडीच्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्यानंतर संतोष ठाकूर यांनी दोन दिवसासाठी आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करताना दोन दिवसात पाणी आणि रस्त्याची समस्या  न सुटल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील, नंदा म्हात्रे, सचिन गावंड, विशाल पवार, किशोर पाटील, सुनीता पाटील, कल्पना पवार,मनीषा वाघमारे, ताई वाघमारे, पार्वती दामोदर नाईक, सोमी वाघमारे आणि शंकर वाघमारे यांच्यासह शेकडो आदिवासी स्त्री-पुरुष जल समाधी आंदोलनात सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!