महाराष्ट्र ग्रामीण
रोहा प्रांताधिकाऱ्यांचे आदेश डावलून उच्च दाब वीज मनोरे उभारण्याचे काम पुन्हा सुरू
स्थानिक दलालांना हाताशी घेऊन ठेकेदार कंपनीची दादागिरी

रोहा प्रांताधिकाऱ्यांचे आदेश डावलून उच्च दाब वीज मनोरे उभारण्याचे काम पुन्हा सुरू
स्थानिक दलालांना हाताशी घेऊन ठेकेदार कंपनीची दादागिरी
पळस व कोंडगाव हद्दीतील शेतकऱ्यांची पोलिसांत तक्रार
महेश पवार
नागोठणे : रोहा प्रांताधिकारी कार्यालयात २ मे रोजी संपन्न झालेल्या चर्चेनुसार शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत उच्च दाब वीज वाहिनी मनोरे उभारण्याचे काम बंद ठेवण्याचे आदेश महापारेषण कंपनीने मान्य केलेले असतांनाच स्थानिक दलालांना हाताशी धरून हे मनोरे उभारण्याचे काम ठेकेदार बी. एन.सी. पॉवर प्रोजेक्ट कंपनीने पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात या प्रकरणी शेतकऱ्यांचा भडका उडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित करून येथील शेतकरी संघर्ष समितीने नागोठणे पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली आहे.

डोलवी (ता. पेण) येथील जे एस डब्लू स्टील या कंपनीसाठी नागोठणेजवळील कानसई येथील महापारेषण कंपनीच्या उपकेंद्रातून उच्च दाबाची वीज वाहिनी टाकण्याचे काम बी. एन.सी. पॉवर प्रोजेक्ट, पुणे या ठेकेदार कंपनीकडून सुरू करण्यात आले आहे. मात्र या उच्च दाब वीज वाहिनीमुळे बाधित होणाऱ्या रोहा तालुक्यातील पळस व कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील पळस, शेतपळस, निडी, मुरावाडी, बाहेरशिव, वाघळी आदी गावांतील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या नोटीसा देण्यात आल्या नाहीत वा आर्थिक मोबदलाही देण्यात आला नाही. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांचे भविष्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सर्वत्र अर्ज निवेदने दिली. मात्र संबंधित यंत्रणेकडून व महापारेषण तसेच जे एस डब्लू स्टील कंपनीकडून शेतकऱ्यांना दाद देण्यात आली नाही. शेवटी त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी १६ एप्रिल रोजी प्रांताधिकारी व पोलिस उपअधीक्षक, रोहा यांना निवेदन देत आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. त्याची दखल घेत २ मे रोजी रोहा प्रांताधिकारी कार्यालयात शेतकरी व संबधित अधिकारी यांची बैठक प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी कळवा(ठाणे) येथील अतिउच्च दाब प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वाढवे, रोहा तहसीलदार डॉ. किशोर देशमुख, नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी बी. एन.सी. पॉवर प्रोजेक्ट, पुणे या कंपनीचे अधिकारी राजेश चौधरी, भरत चौगुले तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
” दरम्यान पेण हद्दीतील आमटेम ते डोलवी अंतरातील मनोरे उभारण्याचे काम बंद असतांनाच पळस व कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत स्थानिक दलालांमुळे हे काम सुरू करण्यात येत असल्याने स्थानिक दलालांच्या विरोधात शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. “
प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत उच्च दाब वीज मनोऱ्यासाठी बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ठरलेल्या दरानुसार नुकसानभरपाई देणे, बाधित होणाऱ्या जमिनीचा मालक असलेल्या शेतकऱ्याला ७/१२ चा आधार घेऊन त्याप्रमाणे बाधित होणाऱ्या शेतकऱ्याला नव्याने नोटीसा देण्यात याव्यात, बाधित शेतकऱ्यांना नोटीसा देण्यापूर्वी कोणाचे किती क्षेत्र बाधित होणार आहे. तसेच कोणाला किती मोबदला रक्कम देण्यात येईल याबाबत यादी तयार करून ती यादी ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिद्ध करावी. शेतकऱ्यांना सर्व्हे नंबर निहाय किती क्षेत्र बाधित होणार आहे. तसेच नुकसान भरपाईच्या रकमेचा उल्लेख करून महापारेषण कंपनीने सर्व संबंधित शेतकऱ्यांना नव्याने नोटीसा देण्यात याव्यात आणि तोपर्यंत काम बंद ठेवण्याचे महापारेषण कंपनीने मान्य केलेले असूनही मनोरे उभारण्याचे काम सुरू झाल्याने शेतकऱ्यांचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.