महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवस
सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ शिर्के यांचा वाढदिवस सेवानिवृत्त संघटनेने केला साजरा

सेवानिवृत्त कर्मचारी रामभाऊ शिर्के यांचा ८५ वा वाढदिवस सेवानिवृत्त संघटनेने केला साजरा
महेश पवार
नागोठणे : नागोठणे शहर व ग्रामीण विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना असलेल्या नागोठणे विभाग शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेकडून नेहमीच वैविध्यपूर्ण व स्तुत्य असे उपक्रम राबविले जात असतात. याचाच एक भाग म्हणून सेवानिवृत्त संघटनेचे कर्मचारी असलेले नागोठण्याजवळील कडसुरे येथील रामभाऊ भागोजी शिर्के यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सेवानिवृत्त संघटनेकडून त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
नागोठणे विभाग शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा बुधवार दिनांक ७ मे रोजी नागोठण्यात राजनशेठ उपाध्ये यांचे निवासस्थानी घेण्यात आली. या सभेत संघटनेचे वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचारी सभासद रामभाऊ भागोजी शिर्के यांच्या वयाला ८५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा वाढदिवस केक कापून आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.
सेवानिवृत्त संघटनेकडून रामभाऊ शिर्के यांना यावेळी श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांना भविष्यातील निरोगी दीर्घायुष्यासाठी उपस्थित सर्व सभासदांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. रामभाऊ शिर्के यांनी रोहा तालुक्यात ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी म्हणून उत्तमरित्या सेवा केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम झोलगे, उपाध्यक्ष दामोदर भोईर, सहसचिव नरेंद्र सोष्टे, सभासद के.के.कुथे, जयराम पवार, उल्हास नागोठकर, सुरेश जांबेकर आदींसह सर्व सभासद बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.