खेळमहाराष्ट्र ग्रामीणवाढदिवस
धाटाव येथील ज्येष्ठ कबड्डीपटू व प्रशिक्षक परशुराम रटाटे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात
शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राष्ट्रीय खेळाडूंची सोहळ्यास उपस्थिती

धाटाव येथील ज्येष्ठ कबड्डीपटू व प्रशिक्षक परशुराम रटाटे यांचा सेवानिवृत्ती सोहळा उत्साहात
शिवछत्रपती पुरस्कार विजेते व राष्ट्रीय खेळाडूंची सोहळ्यास उपस्थिती
महेश पवार
नागोठणे : रोहा तालुक्यातील धाटाव येथील रहिवासी आणि ज्येष्ठ कबड्डीपटू तसेच वरिष्ठ कबड्डी प्रशिक्षक आणि सर्वत्र आण्णा या नावाने ओळखले जाणारे परशुराम तुकाराम रटाटे यांचा सेवानिवृत्ती सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धाटाव औद्योगिक वसाहतीमधील सुदर्शन केमिकल लिमिटेड या कंपनीतील न्यू ऍझो बेंझ या विमानासाठी लागणारे रंग तयार करणाऱ्या प्लांट मधून ते ३१ मे, २०२५ रोजी ते सेवानिवृत्त झाले. आपला आवडता कबड्डी हा खेळ मनापासून जोपासून सुदर्शन कंपनीत त्यांनी सुमारे ३९ वर्ष सेवा केली.

१ जून रोजी परशुराम रटाटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या निवासस्थाना शेजारीच आकर्षकरित्या तयार करण्यात आलेल्या स्टेजवर संपन्न झालेल्या या सेवापूर्ती व वाढदिवस कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, राष्ट्रवादीचे रोहा तालुका अध्यक्ष विनोदभाऊ पाशिलकर, सुदर्शन केमिकल्स कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर डी.एच.पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर संजय धोदरे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते पेण तालुक्यातील खेळाडू प्रमोद म्हात्रे (बेणेघाट) व संजय म्हात्रे (बोरी) यांच्यासह राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विपुल मोकल (कारावी), दत्ता म्हात्रे (मेढेखार), दत्ता पिंगळे (कुर्डूस), कुमार धुमाळ (दिवलांग), प्रदीप कटोर (नवगाव), संदीप भोसले (हिंदुजा हॉस्पिटल), लक्ष्मण गावंड (पांडापूर), महेश धुमाळ (दिवलांग), सागर गायकर (सुडकोली), प्राण भगत (वायशेत), रोहा तालुका कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, प्रीमियम चिक फिड्स चे सीईओ दर्शन म्हात्रे, ॲड. गीता दर्शन म्हात्रे, परशुराम रटाटे यांच्या पत्नी प्रमिला रटाटे, मुलगे प्रणय व प्रणित, सुना रेवा प्रणय रटाटे व माधुरी प्रणित रटाटे, नातवंडे कु. रिशांक प्रणय रटाटे व कु. दुर्वांश प्रणित रटाटे आदींसह परशुराम रटाटे यांच्या परिवारातील सर्व सदस्य, नातेवाईक, ग्रामस्थ व मित्रपरिवार यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

परशुराम रटाटे यांनी वयाच्या तेराव्या वर्षी किशोर गटातून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर वयाच्या सोळाव्या वर्षी कुमार गटातून रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले. धाटावच्या आपल्या संघातून खेळण्याबरोबरच त्यांनी रायगड जिल्ह्यात नावाजलेल्या अशा म्हसोबा शहापूर या कबड्डी संघाचेही त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केले. कबड्डी खेळात किशोर गट, कुमार गट व प्रौढ गटात रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी अनेक मैदाने आपल्या खेळाने गाजविली. कबड्डी खेळाच्या राज्यस्तरीय फेडरेशन कप मध्ये रायगड जिल्ह्याच्या किशोर गट संघाचे दोन वेळा, कुमार गट संघाचे दोन वेळा तर प्रौढ गट कबड्डी संघाचे तीन वेळा प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. तसेच बालेवाडी (पुणे) येथील क्रीडा संकुलामध्येही त्यांनी कबड्डी प्रशिक्षक म्हणून काही काळ काम पाहिले. कबड्डी खेळाची त्यांनी सुमारे ३७ वर्षे सेवा केली व आजही नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांची कबड्डीची सेवा सुरू असून ती अविरत सुरू ठेवण्याचा त्यांचा मानस आहे. परशुराम रटाटे यांच्या प्रेमाखातर या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात त्यांना सेवानिवृत्तीसाठी आणि उदंड निरोगी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तर यावेळी त्यांचा छोटा मुलगा व कबड्डीपटू प्रणित रटाटे यांनीही अत्यंत भावूक होऊन आपल्या वडिलांबद्दल मनोगत व्यक्त करून उपस्थित सर्वांची दाद मिळविली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत मोरे यांनी केले.
