पूरमहाराष्ट्र ग्रामीणवाहतूक
नागोठणे येथील अंबा नदीला अतिवृष्टीमुळे पूर
अंबा नदीने धारण केला रुद्रावतार

नागोठणे येथील अंबा नदीला अतिवृष्टीमुळे पूर
अंबा नदीने धारण केला रुद्रावतार
धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी शिरले नागोठण्यात
एस.टी.बस स्थानकासह शहरातील सखल भागात व मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूला पाणीच पाणी
नागोठणे : गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्यासह नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले असतानाच गेले दोन-चार दिवसांपासून दुथडी भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीने गुरुवारी (दि.१९) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. यानंतर अगदी काही तासांतच नागोठणे अंबा नदीच्या काठावरील सकल भागातील एस.टी.स्थानक, आठवडा बाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक व बाजारपेठ, बंगले आळी, श्री मरिआई मंदिरा समोरील मिनिडोर रिक्षा स्टँड व श्री मरिआई मंदिर परिसर, नागोठणे कोळीवाडा, हॉटेल लेक व्ह्यू समोरील परिसरात यावेळी पूराचे पाणी शिरले. या पुरामुळे अंबा नदीवरील ऐतिहासिक पुल पूर्णता पाण्याखाली गेला होता.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असतानाच अतिवृष्टीमुळे नागोठणेसह विभागात तसेच पाली, खोपोली या ठिकाणी पडत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर अधिक वाढल्याने अंबा नदीच्या पात्रात वाढ होत अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. यामुळे नागोठणे येथील एस.टी. स्थानक, आठवडाबाजार, सकल भागातील काही दुकानात, मिनीडोअर रिक्षा स्टँड तसेच कोळीवाडा भागात, हॉटेल लेक व्ह्यू परिसरात पुराचे पाणी शिरले. यामुळे या भागातील नागरिकांना, दुकानदारांना, भाजी विक्रेते, हातगाडी व्यावसायिक, टपरीधारक यांना आपल्या सामानाची हलवाहलव करण्यासाठी खुप त्रास सोसावा लागला. लेकव्ह्यू हॉटेल समोरील रस्ता, विशाल मेडिकल समोर असलेल्या मिनिडोर रिक्षा स्टँडच्या परिसरात तसेच नागोठणे एस.टी.बस स्थानकासामोरील परिसरात पूराचे पाणी आल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. अतिवृष्टीच्या पार्श्वभुमीवर शासनाने उशिरा सुट्टी जाहीर केल्याने सकाळी नागोठणे परिसरातून शिक्षणासाठी नागोठण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची यावेळी तारांबळ उडाल्याचे दिसून आले. याचबरोबर यावेळी परिसरातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही याचा फटका बसला. या आलेल्या पुरामुळे एस.टी.स्थानकात येणाऱ्या गाड्यांना काही काळ नागोठणे येथील मुंबई गोवा महामार्गावर थांबावे लागले होते. तसेच पूर आलेल्या परिसरातील सर्वांनाच या पूराच्या परिस्थितीचा सामना करावा लागला.
दरम्यान नागोठणे परीसरात पावसाचा जोर कायम असल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होत असल्याने याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्वत्र पोलिस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती.

नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून पूरपरिस्थितीची पाहणीनागोठणे शहरामध्ये आंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असता नागोठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुप्रिया संजय महाडिक, उपसरपंच अखलाक पानसरे, नागोठणे ग्रामपंचायतीचे पहिले लोकनियुक्त सरपंच तथा सदस्य डॉ. मिलिंद धात्रक, नागोठणे ग्रामपंचायतीचे अधिकारी राकेश टेमघरे,सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सदस्या. सौ.अमृता महाडिक,सौ. भाविका गिजे , सौ.सुप्रिया काकडे, सौ. पूनम काळे तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी पूर आलेल्या ठिकाणी जाऊन पूरपरिस्थितीचा आढावा घेतला.

हवामान विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात देण्यात आलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून करण्यात आलेल्या आवाहन यामुळे दुकानदार व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर नागोठण्याची पुरपरिस्थिती नियंञणाखाली ठेवण्याकरीता तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागोठणे परिसरातील पूरपरिस्थिती निर्माण झालेल्या सर्वच ठिकाणी नागोठणे पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित राहून नागरिकांना वेळोवेळी सूचना करत आहेत त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे.”सचिन कुलकर्णी – सपोनि, पोलिस ठाणे नागोठणे

शेतपळस येथील अनेक घरांना पुराचा वेढा….
रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील सुधागड, पेण, माणगाव, अलिबाग या सर्वच तालुक्यांना अतिवृष्टीमुळे पावसाने झोडपून काढले आहे. सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील शेतपळस येथील अनेक घरांना पुराचा पाण्याने वेढा घातला होता. नागोठण्याजवळील ऐनघर पंचक्रोशीतील तसेच चिकणी, निडी, पळस, शेतपळस, पाटणसई, कोलेटी येथील सकल भागातील शेतजमीनही पाण्याखाली गेली आहे.