अपघातमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणेकरांची गुरुवारची रात्र गेली काळोखात
वीजवाहिन्या तुटल्याने व विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा झाला खंडित

नागोठणेकरांची गुरुवारची रात्र गेली काळोखात
वीजवाहिन्या तुटल्याने व विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा झाला खंडित
परिसरात अनेक ठिकाणी झाडे कोसळली
महेश पवार
नागोठणे : खंडित होणाऱ्या विजेच्या बाबतीत शांत व संयमी असलेल्या नागोठणेकरांचे हाल काही संपता संपत नाहीत. सध्या नागोठणे शहर व परिसरात कोणत्या ना कोणत्या कारणाने विजेचा लपंडाव सुरू असतांनाच गुरुवारी (दि.१२) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या वादळवाऱ्याने वीजवाहिन्या व विद्युत खांबाची मोडतोड होऊन नागोठण्याची वीज गुल झाली. काही भागात रात्री ३ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला तर काही भागात रात्रभर वीज न आल्याने नागोठणेकरांची गुरुवारची रात्र काळोखात गेल्याचे पहावयास मिळाले. गुरुवारच्या वादळवाऱ्यामुळे नागोठणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे कोसळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मे महिन्यात धिंगाणा घालणाऱ्या पावसाने जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतली आहे. मे महिन्यात धो – धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर जून महिन्यात मोठ्या प्रमाणात मंदावला. पाऊस थांबल्याने उष्म्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली. जून महिन्यात तुरळक पडणाऱ्या पावसाने नागोठणे शहर व परिसरात १२ जून रोजी रात्री अचानक वादळ वाऱ्यासह पुन्हा जोरदार आगमन केले. यामध्ये पाऊस कमी आणि वादळवाराच जास्त होता. या वादळवाऱ्यामध्ये नागोठण्यातील के. एम. जी. विभागाच्या प्रवेशद्वारात जीर्ण झालेल्या उच्च वीज दाब वहिनीने अखेरचा श्वास घेतल्याने संपूर्ण नागोठणे शहर काळोखात गेले. तुटलेल्या वीज वाहिनीच्या ठिकाणी नवीन वीजवाहिनी टाकून वीजपुरवठा सुरळीत करण्यास रात्रीचे ३ वाजले आणि तोपर्यंत वीज वितरणाच्या नावाने केवळ सोशल मीडियावर संताप व्यक्त करून व बोटे मोडून झाल्या नंतर वीज आल्याने नागोठणेकर पहाटेच्या गाढ झोपेत निद्रिस्त झाले.
वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे हे काम झाले तरी येथील हायवे नाका परिसरात बँक ऑफ इंडिया लगत महाकाय वृक्ष पडल्याने विजेचा वाहिन्या तुटल्या व विजेचा खांब आडवा झाला. त्यामुळे या भागातील नागरिकांना तर संपूर्ण रात्रच काळोखात काढावी लागली. विजेचा खांब बदलून व नवीन वीज वाहिन्या टाकून झाल्यानंतर या भागातील वीजपुरवठ शुक्रवारी (दि.१३) दुपारी १.३० वाजता पूर्ववत झाला. त्यामुळे नागरिकांना हायसे वाटले असले तरी वीज गायब होण्याचे संकट आपल्यावर नेहमीप्रमाणे कधीही येऊ शकते याची पक्की जाणीव नागोठणेकरांना असल्याने त्यांनी वीज वितरणाचे धन्यवाद मानणे आता सोडून दिले असल्याचे दिसून येत आहे.