महाराष्ट्र ग्रामीणराजकारण
शिवसेना(उबठा) रोहा तालुका प्रमुखपद देताना निष्ठावंत शिवसैनिकांचा विचार नाही
नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले यांना डावळले

शिवसेना(उबठा) रोहा तालुका प्रमुखपद देताना निष्ठावंत शिवसैनिकांचा विचार नाही
नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले यांना डावळले
निष्ठावंतांचे लोणचे घालायचे काय ?
नागोठणे शाखाप्रमुख धनंजय जगताप यांचा सवाल
महेश पवार
नागोठणे : शिवसेना (उबाठा) रोहा तालुकाप्रमुखपदी रोहा येथील नितीन वांरंगे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. पण ही निवड करीत असताना संघटनेच्या रितीप्रमाणे सर्वसामान्य शिवसैनिकांचे मत मागवण्यात आले नाही. धनदांडगे व तथाकथित अनुभवी नेते यांच्या कानपिचक्यांनी ही निवड करण्यात आली. पण अशा निवडीत शिवसेनेला नागोठणे विभागात बळ देणारे नागोठणे विभागप्रमुख संजय भोसले यांना डावलण्यात आले आहे. आपले कार्य व निष्ठा झोकुन दिलेल्या व्यक्तीला, सामाजिक व राजकीय अशा सर्व आघाड्यांवर तालुक्यात अग्रणी राहणाऱ्या संजय भोसले या व्यक्तीसाठी हा दिवस नक्कीच क्लेशदायक असून अशा निष्ठावंतांचे लोणचे घालायचे काय ? असा सवाल शिवसेना(उबाठा) नागोठणे शहर प्रमुख धनंजय जगताप यांनी उपस्थित केला आहे.

धनंजय जगताप यांनी सांगितले की, शिवसेनेच्या पडझडीच्या काळातही अत्यंत खंबीरपणे रोहा तालुक्यात टिकाव धरणाऱ्या आणि कार्यकर्त्यांना थोपवुन धरणाऱ्या या व्यक्तीची वर्णी मात्र संघटनेने तालुक्याच्या पदावर लावली नाही. यामागे असणारे कारस्थान हे नक्की कोणाचे आहे याचा याचा खुलासा आज ना उद्या नक्की होईल. तसेच केवळ शिवसेना(उबाठा) जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोर जैन यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना दिले जाणारे पद जर संघटना नाकारत असेल तर अशा विचारांच्या पक्षात का राहावे ? असा प्रश्न शिवसैनिकांच्या मनात उद्भवला तर काहीच गैर नाही अशी खदखदही धनंजय जगताप यांनी व्यक्त केली आहे.

संजय भोसले १९९८ पासून ग्राम पातळीवरील राजकारणात ते सक्रिय असताना २००३ साली नागोठणे विभागातील वांगणी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले व आज पर्यंत त्यांनी स्वतःची ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्याचे सातत्य त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली घडतच आहे. ग्रामपंचायत सरपंच ते २०१७ पासुन रोहा पंचायत समितीत शिवसेनेचे आक्रमक प्रतिनिधित्व असा प्रवास असणारा व सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहज सामील होणारा व त्यांच्यात मिसळणारा बहुजन कुणबी समाजाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे संजय भोसले आपली निष्ठा कायम शिवसेनेप्रती बाळगणाऱ्या या जन नेत्याला शिवसेनेसारखी सर्वसामान्यांची संघटना जर संघटनात्मक पद देण्यात कानपिचक्या देणाऱ्यांच्या मताने डावलत असेल तर अशा संघटनेचा स्थानिक पातळीवरील पुढचा प्रवास हा नक्कीच क्लेशदायक असेल हे ही तितकेच खरे असल्याचे दुःखही धनंजय जगताप यांनी व्यक्त केले.
दरम्यान शिवसेनेतील या सर्व घडामोडींवरून सर्वसामान्य निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनात त्यामुळे अशा “निष्ठेचे लोणचे घालायचे काय”? असा संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा माननीय शिवसेनाप्रमुख नक्कीच फेरविचार करतील व योग्य निर्णय घेतील ही अपेक्षा नागोठणे शहर व विभागातील निष्ठावंत शिवसैनिकांतून व्यक्त करण्यात येत आहे.