आरोग्यमहाराष्ट्र ग्रामीण
स्व. बसंती गिते यांच्या स्मरणार्थ मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नागोठणे लायन्स क्लब आयोजित या शिबिरात ४४ रुग्णांची तपासणी

स्व. बसंती गिते यांच्या स्मरणार्थ मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
नागोठणे लायन्स क्लब आयोजित या शिबिरात ४४ रुग्णांची तपासणी
१४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
महेश पवार
नागोठणे : ‘मोतिबिंदू मुक्त रोहा तालुका अभियान’ अंतर्गत स्वर्गिय बसंती तुकाराम गीते यांच्या स्मरणार्थ त्यांच्या दुसऱ्या स्मृती दिना निमीत्त नागोठण्यातील नावाजलेली श्रीकृष्ण लॅबोरेटरीजचे संचालक व नागोठणे लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष लायन डॉ. अनिल गीते यांच्या सौजन्याने बुधवार दिनांक ४ मे रोजी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर येथील शांतीनगर भागातील स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान मध्ये आयोजित करण्यात आले होते.
नवीन पनवेल येथील आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पीटल यांचे सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या या नेत्र चिकित्सा शिबिरात ४४ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामधे मोतिबिंदू आढळलेल्या १४ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी त्वरीत पनवेल येथे नेण्यात आले व त्यांच्या डोळ्यांतील मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.

या शिबिराचे उद्घाटन निवृत्त सैनिक व सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तुकाराम गिते, त्यांचा मुलगा डॉ.अनिल गीते, मुली सौ. श्वेता राजन शेलार, सौ. स्मिता राजेश पाबरेकर, सून सौ. संगिता गिते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन सुनिल कुथे, झोनल चेअरमन एमजेएफ लायन विवेक सुभेकर, डिस्ट्रीक्ट चेअरमन (शिक्षण) एमजेएफ लायन यशवंत चित्रे, शंकरा आय हॉस्पीटलच्या डॉ. सलोनी सुभेकर, उपाध्यक्ष लायन संतोष शहासने, सेक्रेटरी लायन डॉ. अनिल गिते, ट्रेझरर लायन दिपक गायकवाड, चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, एमजेएफ लायन सुधाकर जवके, लायन दौलतराम मोदी लायन सुजाता जवके, लायन विलास चौलकर, लायन विशाल शिंदे, लायन विवेक करडे, लायन दिपक लोणारी, लायन दिपीका गायकवाड, लायन ऋतुजा पांचाळ, लायन सखाराम ताडकर, लायन सिध्देश काळे, लायन विद्या म्हात्रे, लायन विजय शहासने या बरोबरच शंकरा आय हॉस्पीटलचे विजय बामणे सोबत त्यांची टिम तसेच या सेवेचा लाभ घेणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी निवृत्त सैनिक आदरणीय तुकाराम गिते यांनी आपल्या मनोगतात त्यांच्या आयुष्याचा आलेख मांडला. अतिशय काबाडकष्ट करीत खडतर आयुष्य जगत त्यांनी आपल्या तीन मुली व एक मुलगा यांना वाढविले, त्यांच्यावर चांगले संस्कार केले. कष्ट करताना त्यांना अतोनात हाल होत होते परंतु आज त्या कष्टाचे चीज झाल असे ते म्हणाले. कारण त्यांची मुले, नातवंडे उच्च शिक्षीत आहेत. काही परदेशी शिक्षण घेत आहेत तर काही परदेशात नोकरी करीत आहेत. या सर्व जीवन प्रवासात त्यांच्या दिवंगत पत्नी बसंती गिते यांची प्रत्येक प्रसंगात खंबीर अशी साथ मिळाल्यानेच हे शक्य झाल्याचे सांगताना ते भावूक झाले होते.

याबरोबरच डॉ. अनिल गिते यांनीही आपण खेड्यात अतिशय दुर्गम भागात राहून शिक्षण घेत खडतर असा प्रवास करीत आपल्या आई वडीलांच्या कष्टाची जाण व स्वतःचे उच्च ध्येय याचा पाठपुरावा करीत आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण केल हे सांगताना त्यांना अश्रु अनावर झाले. तुकाराम गीते यांची मुलगी शिक्षिका सौ. स्मिताताई पाबरेकर यांनीही मोलाचे मार्गदर्शन केले. गरिबीची जाण असल्यानेच तुकाराम गिते व सौ. श्वेता राजन शेलार यांनी लायन्स क्लबच्या कार्याची दखल घेवून आपल मोठे आर्थिक योगदान देवून सेवेचा भार उचलला. यासाठी लायन्स क्लब तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.
‘मोतिबिंदू मुक्त रोहा तालुका अभियान’ अंतर्गत लायन्स क्लब नागोठणे तर्फे आणि आर झुनझुनवाला – शंकरा आय हॉस्पीटल, पनवेल यांच्या सहकार्याने गेली तीन वर्ष हा स्तुत्य अभियान राबविण्यात येत आहे. नागोठणे लायन्स क्लबने सातत्याने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी नेत्रचिकीत्सा शिबिर घेवून नागोठणे पंचक्रोशीत आपल्या कार्याचा ठसा उमटविला असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.




