महाराष्ट्र ग्रामीणवाढदिवसशैक्षणिक
आपल्या भागातूनही आय. ए.एस. व आय.पी. एस. अधिकारी तयार व्हावेत : अनिकेतभाई तटकरे
खा. सुनील तटकरे यांचा ७० वा वाढदिवस व पिगोंडे ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांच्या ७८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम

आपल्या भागातूनही आय. ए.एस. व आय.पी. एस. अधिकारी तयार व्हावेत : अनिकेतभाई तटकरे
खा. सुनील तटकरे यांचा ७० वा वाढदिवस व पिगोंडे ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांच्या ७८ व्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम
महेश पवार
नागोठणे : पिगोंडे ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांनी खा. तटकरे साहेबांच्या सोबत राहून त्याकाळी राजकारण करतानाच शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे काम केले. आमचे सहकारी संतोष कोळी आज आपल्या वडिलांप्रमाणेच शैक्षणिक, सामाजिक कार्य करून भावी पिढी घडविण्याचे काम करीत आहेत. वेलशेत येथील गीता द. तटकरे विद्यालयासाठी तटकरे साहेबांनी मोलाचे सहकार्य केले आहे. आज या विद्यालयात १० वी पर्यंत विद्यार्थी चांगले शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्यासाठी वरदायिनी ट्रस्टच्या वतीने रोहा येथे लवकरच स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू होत आहे. त्यामुळे कोकणसह आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी केवळ डॉक्टर इंजिनिअर न होता आय. ए.एस. व आय.पी. एस. अधिकारी व्हावे अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व माजी आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी व्यक्त केली.

खासदार सुनील तटकरे यांचा नुकताच संपन्न झालेला ७० वा वाढदिवस व पिगोंडे ग्रामपंचायतीचे दिवंगत सरपंच जनार्दन कोळी यांच्या ७८ व्या जयंतीचे औचित्य साधून संतोषभाई कोळी मित्रमंडळ, वेलशेत–आंबेघर यांच्या वतीने पिगोंडे ग्रामपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी (दि.२५) सकाळी संपन्न झालेल्या शैक्षणिक साहित्य, व्हाईट बोर्ड व डस्टबिन वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राजिप शाळा पिगोंडे, श्रीमती गीता द. तटकरे माध्यमिक विद्यालय तसेच वेलशेत व आंबेघर येथील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी अनिकेतभाई तटकरे यांच्यासह नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी संस्थेचे सभापती सदानंद गायकर, स्व. जनार्दनशेठ कोळी यांचे सुपुत्र पिगोंडे सरपंच संतोषभाई कोळी, चंद्रकांत कोळी, नंदकुमार कोळी, ज्येष्ठ नेते मधुकर ठमके, सुधाकर पारंगे, राष्ट्रवादीचे युवा नेते राकेश शिंदे, सचिन कळसकर, राजेंद्र शिंदे, निवास पवार, रोशन पारंगे, अमित जांबेकर, बाळकृष्ण देवरे, सखाराम घासे, मनोज ताडकर, यादव माळी, दिपक माळी, विजय पारंगे, संतोष ताडकर, जे. डी. पाटील, मारुती पारंगे, हेमंत शहासने, ग्रामपंचायत अधिकारी विजय अहिरे यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदानंद गायकर यांनी आपल्या मनोगतातून खासदार सुनील तटकरे यांची काम करण्याची हातोटी याबद्दल गौरवोद्गार काढतानाच जनार्दन कोळी यांनी कोळी समाजासाठी केलेले कार्य तसेच विविध बाबतीतील त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. संतोषभाई कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात आपले वडील जनार्दन कोळी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातील विचारांचा वारसा घेऊन आम्ही मंडळी काम करीत असल्याचे सांगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असलेले व घेऊन गेलेले कोणतेही काम १०० टक्के पूर्ण होणार याची खात्री असलेले खासदार सुनील तटकरे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी आपण हा उपक्रम राबविल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुंडलिक ताडकर यांनी केले.