गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीणवाहतूक

गुरे चोरट्यांविरोधात नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

टेम्पो, १२ म्हैशी व ६ रेडे यांच्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 

गुरे चोरट्यांविरोधात नागोठणे पोलिसांची धडाकेबाज कारवाई 

टेम्पो, १२ म्हैशी व ६ रेडे यांच्यासह १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त 
गोरक्षकांच्या माहितीमुळे १८ मुक्या जनावरांचा जीव वाचला 
महेश पवार 
नागोठणे : रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरे चोरणाऱ्या टोळ्यांनी जिल्ह्यात हैदोस मांडलेला असतानाच नागोठणे पोलिसांनी
शनिवारी (दि.१२) सकाळी एक आयशर टेम्पो या वाहनावर कारवाई करीत जनावरांची वाहतूक करणाऱ्या एक आरोपीसह एक आयशर टेम्पो व  चोरीच्या १२ म्हैशी व ६ रेडे अशी १८ जनावरे जप्त केली आहेत. आयशर टेम्पोसह जप्त केलेल्या मुद्देमालाची एकत्रित किंमत १५ लाख रुपये असून टेम्पोचालक मोसिन आसमहमंद कुरेशी, वय २५ रा. लोटस मोहल्ला, शिवाजी नगर, गोवंडी – मुंबई याला नागोठणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरे चोरट्यांच्या विरोधात नागोठणे पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. याप्रकरणी मुक्या जनावरांचा जीव वाचविण्यासाठी मोलाचे सहकार्य करणारे नागोठण्यातील गोरक्षक चेतन कामथे, सौरभ जांबेकर व मनीष पवार यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
या संदर्भात उपलब्ध माहितीनुसार १२ जुलै रोजी सकाळी मुंबई गोवा महामार्गावरून महाड ते मुंबई, जनावरांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो येणार असल्याची माहिती गोरक्षक गुप्त बातमीदारांकडून नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांना समजली. त्यांनी तातडीने आपले सहकारी पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे, पो.हे. कॉ. महेश लांगी व हे. कॉ. महेश रुईकर यांच्यासह मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे जवळील आय टी आय कॉलेज समोर सकाळी ६.३० वाजता नाकाबंदी केली. त्याचवेळी गुप्त बातमीदारार्फत माहिती मिळालेला लाल रंगाचा व एम. एच. ०३ डी व्हि ८०२१ या क्रमांकाचा टेम्पो दिसताच या टेम्पोला थांबविण्यात आले. या टेम्पोच्या मागील बाजूस असलेली ताडपत्री वर करून पहिले असता त्यामध्ये ८ ते १० वर्षे वयोगटाच्या ७ म्हैस व ५ रेडे प्रत्येकी २० हजार रुपये (एकत्रित किंमत रुपये २ लाख ४० हजार) किंमतीच्या तसेच सुमारे दीड ते दोन वर्षे वयाच्या ५ म्हैसी व एक रेडा जातीची सहा वासरे प्रत्येकी किंमत रुपये १० हजार (एकत्रित किंमत रुपये ६० हजार) अशी एकूण ३ लाख रुपये किंमतीची जनावरे टेम्पोत चारा व पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने टेम्पोत भरल्याने या सर्व म्हैसी व वासरांना टेम्पो लागून खरचटल्याचे व जखमा झाल्याचे दिसून आले. नागोठणे पोलिसांनी सदर टेम्पो ताब्यात घेतल्यानंतर त्यामधील म्हैसींना नागोठणे पोलिस ठाण्याचे आवारात सुरक्षितपणे मुक्त वातावरणात खाली उतरवून त्यांची तपासणी पशुधन विकास अधिकारी प्रतीक पवालकर यांच्याकडून करण्यात आली.
टेम्पोची मागील बाजू ताडपत्रीने झाकून बेकादेशीरपणे म्हैस व रेडे या जनावरांची त्यांना चार पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता,  दाटीवाटीने निर्दयीपणे वाहतूक करून, त्यांना टेम्पो घासून खरचटण्यास व जखमा होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालक मोसिन आसमहमंद कुरेशी याच्या विरोधात नागोठणे पोलिस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंध अधिनयम १९६० चे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी एवढी मोठी गुरे चोरी करण्याची हिंमत करू शकत नसल्याने या गुन्ह्यात अजून कोणकोण सहभागी आहेत याचा अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे  हे करीत आहेत. 
दरम्यान गुरेमालक आपली गुरे मोकाट सोडत असल्यानेच गुरे चोरांचे फावत आहे. त्यामुळेच गुरे चोरांच्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्या असल्याने गुरे मालकांनी आपल्या गुरांची काळजी घेतानाच आपली गुरे मोकाट सोडू नयेत असे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!