कडसूरेचा सुपुत्र ओमकार शिर्के २३ व्या वर्षी बनला चार्टर्ड अकाऊंटंट
ओमकार शिर्के याचे सर्वत्र होत आहे अभिनंदन

कडसूरेचा सुपुत्र ओमकार शिर्के २३ व्या वर्षी बनला चार्टर्ड अकाऊंटंट
ओमकार शिर्के याचे सर्वत्र होत आहे अभिनंदन
महेश पवार
नागोठणे : रोहा तालुक्यातील व नागोठण्याजवळील कडसूरे गावातील रहिवासी व कडसुरेचे माजी सरपंच भालचंद्र चंद्रकांत शिर्के आणि माजी सरपंच सौ.भावना भालचंद्र शिर्के यांचा सुपुत्र कु. ओमकार भालचंद्र शिर्के (वय २३) याने मे, २०२५ मध्ये झालेल्या चार्टर्ड अकाउंटंट फायनल परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून अत्यंत प्रतिष्ठेची चार्टर्ड अकाऊंटंट (CA) ही पदवी वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी प्राप्त केली आहे. त्यामुळे कडसुरे गावची मान उंचावणाऱ्या ओमकार याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
ओमकारने नर्सरी ते चौथी पर्यंत शिक्षण भा. ए. सो. एस. डी. परमार इंग्लिश मीडियम स्कूल, नागोठणे व पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण रिलायन्स फाऊंडेशन स्कूल मध्ये घेतले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत ओंकार याने ९० टक्के गुण मिळाल्याने त्याने पुढील शिक्षण पुणे येथे घेऊन चार्टर्ड अकाऊंटंट बनण्याचा निर्णय घेतला. बारावीला पुणे येथील नामांकित सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे असतानाच त्याने चार्टर्ड अकाउंटंट अभ्यासक्रमाला सुरुवात केली. बारावीतही त्याने ८५ टक्के गुण मिळविले नंतर याच कॉलेजमधून त्याने बी कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर त्याने अमेझॉन या नामांकित इंटरनॅशनल कंपनीत बंगलोर येथे २ वर्षाची इंडस्ट्रियल ट्रेनिंग पुर्ण केली.
या संपूर्ण प्रवासात त्याने सुरुवातीला काम करून अभ्यास केला व सर्व परीक्षा काळात रोज १५ ते २० तास अभ्यास केला. खूप त्रास करून अडचणी वर मात करून त्याने हा टप्पा गाठला.
या प्रवासात त्याच्या कुटुंबियांनी मोठा त्याग केला. त्याच्या शिक्षणासाठी आईने खासगी शाळेतील शिक्षिकेची नोकरी सोडली आणि वडिलांनी स्वतःचा व्यवसाय बंद करून पुण्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या कठीण वाटचालीत त्याला त्याच्या आजी – श्रीमती रजनी चंद्रकांत शिर्के यांची मोलाची साथ लाभली. तसेच त्याचे आजोबा कै. चंद्रकांत राघो शिर्के, कै.जनार्दन राघो शिर्के आणि उमाजी झिटू चव्हाण यांचे शुभाशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. त्याची बहीण स्वरूपा भालचंद्र शिर्के हिनेसुद्धा त्याला सतत प्रोत्साहन दिले आहे. स्वरूपा हिनेही ओंकारच्या पावलावर पाऊल ठेवत सिंबायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधून पदवी पूर्ण केली असून सध्या ती MIT-WPU, पुणे येथून एमबीए करीत आहे. या यशानंतर ओमकरने आत्तापर्यंतच्या सर्व शैक्षणिक प्रवासात लाभलेल्या सर्व शिक्षकांचे, परिवाराचे, नातेवाईकांचे, मित्र परिवाराचे आणि कडसूरे गावातील सर्व ग्रामस्थांचे व सर्व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.