गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठणे मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक

नागोठणे मोबाईल टॉवर बॅटरी चोरीच्या गुन्ह्यातील पाच आरोपींना अटक
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी
महेश पवार
नागोठणे : नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीच्या घटनेत फरार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या अलिबाग शाखेने जेरबंद केले आहे. या आरोपींना शुक्रवारी (दि.११) रात्री नागोठणे पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. या आरोपींना नागोठणे पोलिसांनी रोहा येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या आरोपींमध्ये फारुख रोजन चौधरी, वय ३९, रा. रे रोड मुंबई, कृष्ण बिहारी रामभरोसे यादव उर्फ छुटकन उर्फ सुनील, वय ३० रा. अंबरनाथ ठाणे, जमीर उल्ला इसरास अहमद, वय २३, रा. अंबरनाथ पूर्व, ठाणे, जावेद हद्दीस खान, वय ३४, धनसे कॉम्प्लेक्स, रोहा रायगड, फैसल मोहम्मद रोजन चौधरी, वय ३५ रा. अंबरनाथ पूर्व, ठाणे या पाच जणांचा समावेश आहे.
नागोठणे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेतपळस येथील श्री आकादेवी मंदिर परिसरात असलेल्या मोबाईल टॉवर मधील यंत्रणेतील २२ बॅटरी चोरीस जाण्याची घटना २६ जून, २०२५ रोजी घडली होती. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण अलिबाग शाखेकडे सोपविण्यात आला होता. त्यानुसार त्यांनी केलेल्या तपासानुसार पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणी पुढील तपास नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुरज पाटील हे करीत आहेत.




