गुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
नागोठण्यात चोरट्यांचा घरफोडीचा प्लॅन फसला
नागोठण्यात दुचाकी मधील पेट्रोलचीही होत आहे चोरी

नागोठण्यात चोरट्यांचा घरफोडीचा प्लॅन फसला
भरदिवसा केला होता चोरीचा प्रयत्न
नागोठण्यात दुचाकी मधील पेट्रोलचीही होत आहे चोरी
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील शांतीनगर भागातील गजबजलेल्या एका हाऊसिंग सोसायटीच्या इमारतीत भर दिवसा घरफोडी करण्याचा प्रकार शुक्रवार दिनांक ४ जुलै रोजी दुपारी घडली आहे. मात्र सदर घरफोडी मध्ये चोरट्यांच्या हातात “ठणठण गोपाळ” अर्थात काहीच न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाती परत जावे लागले आहे. तसेच नागोठण्यातील हौसिंग सोसायटीच्या इमारती मधील दुचाकींमधून पेट्रोल चोरी होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे भर दिवसा झालेल्या या घरफोडीमुळे नागरिकांत घबराट तर पोलिस यंत्रणेची या चोरट्यांना काही भीती राहिलीय की, नाही अशी चर्चा नागोठणे शहरात रंगली आहे.
नागोठणे शांतीनगर भागात दवावाला इमारती जवळच, मागील बाजूस असलेल्या या इमारती मधील तिसऱ्या मजल्यावर आपल्या कुटुंबासह भाड्याने राहणारा विश्व वर्धन नावाचा व्यक्ती सुकेळी येथील कंपनीत जनरल ड्यूटीवर कामाला गेला होता. कंपनीतून सुट्टी होण्याची वेळ ५.३० ची असल्याने सदर व्यक्तीस घरी पोहोचण्यास सहा वाजणार होते. या व्यक्तीचे कुटुंबही गावी गेल्याने सदर इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या आपल्या फ्लॅटला कुलूप लावून तो कंपनीत गेला होता. घराला कुलूप बघितलेल्या चोरट्यांनी त्याच्या शेजारी असलेल्या तीन फ्लॅटला बाहेरून कडी लावून या व्यक्तीचा कडी कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. फ्लॅट मधील कपाट व इतर सर्व जागी शोधाशोध करूनही चोरट्यांच्या हाताला काहीच न लागल्याने ते निघून गेले. मात्र आपल्या फ्लॅटला बाहेरून कडी लावल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी इमारती मधील इतरांना बोलवून कडी काढल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी तातडीने विश्व वर्धन याला कळविल्याने तो दुपारीच घरी आला. नंतर नागोठणे पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी आले होते.
दरम्यान नागोठणे मध्ये दिवसा ढवळ्या घडलेल्या या घरफोडीच्या प्रकारामुळे व पेट्रोल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागोठण्यातील सर्व हौसिंग सोसायटीच्या आवारात सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात याव्यात अशा सूचना नागोठणे पोलिस ठाण्याकडून करण्यात आल्या आहेत.