नागोठण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी
मंदिरात खिचडी व तुळशी रोपट्याचे वाटप
महेश पवार
नागोठणे : नागोठण्यातील श्री ज्ञानेश्वर व विठठ्ल रूक्मिणी मंदिरात रविवारी (दि.६) आषाढी एकादशी अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त येथील संत सेवा मंडळाच्या वतीने ज्ञानेश्वर मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी निमित्ताने विठू माउलीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात दिवसभर हरिनामाचा गजर सुरू होता. विद्यार्थ्यांच्या दिंडीत नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि सचिन कुलकर्णी यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

श्री ज्ञानेश्वर मंदिरातील आषाढी एकादशीच्या या कार्यक्रमाची सुरुवात पहाटे चार वाजता श्री विठ्ठल रूक्मिणी यांच्या काकड आरतीने करण्यात आली. त्यावेळी अनेक भाविकांसह नागोठणे सरपंच सुप्रियाताई महाडिक उपस्थित होत्या. त्यानंतर पहाटे पाच वाजता विठ्ठल रूक्मिणींच्या मुर्तींवर संतोष इप्ते, मंगेश नागोठणेकर, विशाल मांडे, सिद्धेश ठोंबरे, योगेश म्हात्रे, राजू नाकते, आशिष भोय यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक करण्यात आला. नंतर सकाळी ९.३० वाजता देवाचे भजन घेण्यात आले तसेच दिंड्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुपारी १ वाजता नागोठणे मित्र मंडळ यांच्याकडून देवाचे भजन घेण्यात आले.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने येथील भारतीय एज्यकेशन सोसायटीच्या एस.डी. परमार इंग्लिश मिडियम स्कूल व होली एंजल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून संताच्या व वारक-यांच्या वेशात दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंड्याचे मंदिरात आगमन झाल्यानंतर या छोट्या वारकऱ्यांचे श्री संत सेवा मंडळाच्या वतीने फुले देऊन स्वागत करण्यात आले व त्यांना प्रसाद म्हणून केळी व लाडूचे वाटप करण्यात आले. यावेळी भाएसो एस.डी.परमार शाळा समिती अध्यक्ष सुरेश जैन, होली एंजल स्कूलचे चेअरमन विजय मुल्कवाड उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सुधाकर जवके यांनी सर्व भक्तांना खिचडीचा फराळ दिला. तसेच अनेक दानशूर नागरिकांनी उपस्थित भक्तांसाठी केळी व राजगिरा लाडूची व्यवस्था केली होती. याशिवाय रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या १० जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नागोठणे ग्रामपंचायतीच्या सदस्या पूनम काळे व प्रथमेश काळे यांच्याकडून मंदिरात आलेल्या भाविकांना तुळशीच्या रोपाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन, माजी सरपंच विलास चौलकर, बाळासाहेब टके, सुधाकर जवके, संत सेवा मंडळाचे अध्यक्ष शैलेश रावकर, माजी अध्यक्ष रतन हेंडे, प्रकाश मोरे, मधुकर महाडिक, सुजाता जवके, दिपाली टके, आशा शिर्के, श्वेता चौलकर, प्रतिभा तेरडे, मामी शहासने, कल्पना टेमकर, सुनीता इप्ते, अनिता पवार, राजू मोदी, राजेश पिंपळे, भारत भोय, शिवाजी पवार, निलेश म्हात्रे आदींसह अनेक भाविक यावेळी उपस्थित होते.
शेवटी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत हभप विजय महाराज शहासने यांनी विठ्ठल भक्तांसाठी सुश्राव्य असे प्रवचन केले. नंतर हरिपाठाच्या कार्यक्रमाने या धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नागोठण्यातील श्री ज्ञानेश्वर मंदिरातील आषाढी एकादशीच्या या धार्मिक कार्यक्रमाला संत सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.