कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
वकिली ही एक शाळा आहे, त्यामध्ये आपण सतत शिकत राहिले पाहिजे : न्यायाधीश एस. व्ही. खैरे
रोहा न्यायालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ वकिलांचा सन्मान

वकिली ही एक शाळा आहे, त्यामध्ये आपण सतत शिकत राहिले पाहिजे : न्यायाधीश एस. व्ही. खैरे
रोहा न्यायालयात गुरुपौर्णिमेनिमित्त ज्येष्ठ वकिलांचा सन्मान
महेश पवार
नागोठणे : वकिलीची कोणतीही पार्श्वभूमी नसल्याने माझ्या घरातील मी पहिलाच वकील, पहिलाच न्यायाधीश झालो. पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढताना मनात एक वेगळी भीती होती. सीनियरने पहिल्याच दिवशी मुदतीचा अर्ज देऊन तारीख वाढवून घेण्याचे काम सांगितले आणि माझ्या कामाची सुरुवात झाली. कोर्टासमोर वागताना नेहमी विनयशीलतेने, आदबीने वागले पाहिजे. माझा आजपर्यंतचा अनुभव पाहता रोहा न्यायालयातील वकिलांचे वागणे चांगले असल्याचे जाणवले आहे. ज्युनिअर वकिलांनी सीनियर वकिलांचे कोर्टासमोर चाललेले काम ऐकले पाहिजे. कारण वकिली ही एक शाळा आहे आणि त्यामध्ये आपण सतत शिकत राहिले पाहिजे असे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन रोहा न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश एस. व्हि. खैरे यांनी गुरुपर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

रोहा वकील संघटनेच्या सहकार्याने व अधिवक्ता परिषद रोहा शाखा यांच्या वतीने रोहा न्यायालयातील वकील बार रुम मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी (दि.९) सायंकाळी न्यायालयीन कामकाजाच्या वेळेनंतर संपन्न झालेल्या रोहा न्यायालयातील ज्येष्ठ वकिलांचा सन्मान व ज्येष्ठ वकिलांचे वकिली क्षेत्रातील अनुभव कथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी न्यायाधीश एस. व्हि. खैरे बोलत होते.

या कार्यक्रमात ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. आर. बी. सावंत, ॲड. एस. एन. सानप, ॲड. एम. डी. पाटील, ॲड. एन. जी. देशमुख यांचा कार्यक्रमात तर काही कारणास्तव कार्यक्रमास उपस्थित न राहिलेले ॲड. हेमंत गांगल, ॲड. पी.एच.पाटकर, ॲड. व्हि. डी. मोरे, ॲड. पी. के. देशमुख यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन रोहा अधिवक्ता परिषदेतर्फे अध्यक्ष धनंजय धारप व पदाधिकाऱ्यांनी जाऊन सत्कार केला. यावेळी ज्येष्ठ विधिज्ञ आर. बी. सावंत, एस. एन. सानप, एम. डी. पाटील यांनी आपले अनुभव कथन करून उपस्थित वकील वर्गाला बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी अधिवक्ता परिषदेचे अध्यक्ष ॲड. धनंजय धारप यांनी ज्येष्ठ वकिलांनी उत्तम मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचे आभार मानले व अधिवक्ता परिषदेतर्फे भविष्यातही असे विविध उपक्रम राबविले जातील याची ग्वाही दिली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड मनोज शिंदे यांनी केले. ॲड. शीतल सानप यांनी गुरुपौर्णिमे बद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली. ॲड दिव्या सावंत यांनी केलेले उत्कृष्ट सूत्र संचालन, ॲड मीनल मनोहर यांचे मनोगत व ॲड स्मिता कुथे यांचे आभार प्रदर्शन यांनी कार्यक्रमाची शोभा वाढविली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲड. दिनेश वर्मा, ॲड. महेश घायले, ॲड. प्रतीक पाटणकर, ॲड. समीर सानप, ॲड. ओंकार शिलधनकर यांच्यासह अधिवक्ता परिषदेचे सर्व सदस्य व महिला सदस्य यांनी मेहनत घेतली.





