कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
आगामी सण–उत्सव उत्साहात पण शांततेत साजरे करा : सपोनि सचिन कुलकर्णी
शांतताप्रिय नागोठण्याला गालबोट लावू देऊ नका

आगामी सण–उत्सव उत्साहात पण शांततेत साजरे करा : सपोनि सचिन कुलकर्णी
शांतताप्रिय नागोठण्याला गालबोट लावू देऊ नका
महेश पवार
नागोठणे : नागोठणे हे शांतताप्रिय असल्याचा इतिहास आहे. त्यामुळे त्याला कुठेही गालबोट लागेल व उपलब्ध पोलिस बळाचा वापर करून कारवाई करावी लागेल असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या. कोणतीही माहिती मिळाली तर तुम्ही कायदा हातात न घेता पोलिसांना कळवा. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवा व काही संशयास्पद वाटल्यास थेट मला संपर्क करा. तसेच आगामी रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा, कृष्णजन्म, दहीहंडी यांसह पुढील काळात येणारे सर्वधर्मीय सण व उत्सव जातीय सलोखा राखून शांततेत साजरे करा आणि शांतताप्रिय नागोठण्याला गालबोट लावू देऊ नका असे आवाहन नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.
आगामी येणारे नारळीपोर्णिमा रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती गोपाळकाला सणाच्य अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील शांतता समिती सदस्य, पत्रकार, मोहल्ला कमिटी सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य यांची बैठक नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्या दालनात सोमवारी (दि. ४) सायंकाळी सहा वाजता घेण्यात आली त्यावेळी सपोनि सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासंदर्भात उपयुक्त असलेल्या अनेक बाबतीत बहुमोल मार्गदर्शन केले.
या बैठकीला सपोनि सचिन कुलकर्णी यांच्यासह सिराजभाई पानसरे, मुजफ्फर कडवेकर, अकबर सय्यद, पो.हे. कॉ. स्वप्नील भालेराव, पो.हे. कॉ. अथर्व पाटील, महिला दक्षता समितीच्या सदस्या सुजाता जवके, निलोफर पानसरे, राजश्री टके, शबाना मुल्ला, नंदा गायकवाड, संगीता पोलसानी, कांचन शेळके, अपर्णा सुटे, मंजुळा म्हात्रे आदींसह पत्रकार व नागरिक यावेळी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना सचिन कुलकर्णी यांनी श्रीकृष्ण जयंती सणाच्या कालावधीत दहीहंडी फोडताना काही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेणे, दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचा संदेश, मजकूर, चित्रफिती, बॅनर, पोस्टर सोशल मीडियावर प्रसारीत न करणे, तसे केल्यास तर प्रचलित कायद्यानुसार होणारी योग्य ती कारवाई, आगामी सण उत्सवाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या परवानगी ही महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार पोर्टल द्वारे घेणे, आपल्या पोलिस ठाण्याचे हद्दीत ५२ सार्वजनिक, २३५ खासगी व ६ मोठ्या दही हंड्या आहेत. या दहीहंडी, गोविंदा पथकाकडून दाखविण्यात येणारे बॅनर व देखावे गोविंदा पथकाने पोलीस ठाण्यात दाखवूनच सादर करणे, दही हंडीच्या वेळेस गर्दी होत असल्याने आपल्या लहान मुलांची काळजी घेणे, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्त्यामध्ये अथवा गर्दीचे ठिकाणी वाहन पार्किंग न करणे, नारळी पौर्णिमा मिरवणूक विसर्जन ठिकाणी लहान मुले व ज्येष्ठ नागरिक हे नारळ काढण्यासाठी खोल पाण्यात जाणार नाहीत याची दक्षता घेणे यांसह अनेक बाबतीत सचिन कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.