पूरमहाराष्ट्र ग्रामीण
अंबा नदीचे पाणी नागोठणे बाजारपेठेत
सलग दुसऱ्या दिवशी नागोठणे शहर व परिसरात पावसाचा कहर

सलग दुसऱ्या दिवशी नागोठणे शहर व परिसरात पावसाचा कहर
अंबा नदीचे पाणी नागोठणे बाजारपेठेत : प्राथमिक आरोग्य केंद्रात कोसळले झाड
भिसे खिंडीत झाड कोसळल्याने मार्ग काही काळ बंद
चेराठी – काळकाई येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने काही वेळ वीजपुरवठा खंडित
महेश पवार
नागोठणे : संपूर्ण रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलेले असतांनाच या मुसळधार पावसामुळे नागोठण्यातील अंबा नदीने मंगळवारी (दि.१९) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे नागोठण्यात चौथ्यांदा पूर आला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अंबा नदीचे हे पाणी नदीकिनारील सर्व सखल भागात आले आहे. नागोठण्यात येणारे दोन्ही मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पुराचे पाणी नागोठणे स्थानकात आल्याने एस टी सेवा विस्कळीत झाली तर नागोठणे बाजारपेठेत पुराचे पाणी आल्याने व्यापारी वर्गाची चिंता वाढली आहे.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाडाची मोठी फांदी कोसळली
जोराच्या पावसामुळे नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूती साठी असलेल्या खोलीवर वटवृक्षाची मोठी फांदी कोसळली आहे. मात्र त्यामुळे प्रसूतिगृह इमारतीचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र झाड कोसळल्याची माहिती मिळताच नागोठणे ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन झाड दूर करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली. तसेच येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांच्या उपस्थितीत ही झाडाची फांदी हटवण्यासाठी एन.व्ही.एस.एस.आर. या संस्थेच्या टीमने मोलाचे सहकार्य केले.

भिसे खिंडीत झाड कोसळल्याने मार्ग काही वेळेसाठी बंद
नागोठणे परिसरात जोराच्या पावसाच्या कहर सुरूच असल्याने नागोठणे रोहा मार्गावरील भिसे खिंडीत दुपारच्या वेळेस झाड कोसळले. त्यामुळे काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक सेवा कोलमडली होती. नंतर सार्वजनिक बांधकाम खात्याची यंत्रणा घटनास्थळी आल्यानंतर हा झाड दूर करून मार्ग पूर्ववत करण्यात आला.

चेराठी – काळकाई येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीजपुरवठा खंडित
वीज वितरण कंपनीच्या नागोठणे कार्यालयाकडून मंगळवारी घेण्यात आलेला शट डाऊन आज पावसामुळे रद्द करण्यात आला. मात्र मुसळधार पावसामुळे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास चेराठी काळकाई येथील डोंगराळ भागात वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिनीवर मोठा झाड उन्मळून पडून नागोठणे परिसरातील कडसुरे येथे एका ठिकाणी व वरवठणे येथे दोन ठिकाणी वी पुरवठा करणाऱ्या मुख्य वीज वाहिन्या तुटल्याने नागोठणे शहर व परिसरातील वीज पुरवठा सुमारे दोन तास खंडित झाला होता. यावेळी नागोठणे महावितरणचे सहाय्यक अभियंता सत्येंद्र सिंग यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने संततधार पावसातही युध्दपातळीवर दुरुस्ती काम पूर्ण करुन वीज पुरवठा दुपारी दोन नंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत केला.




