कायदेविषयकमहाराष्ट्र ग्रामीणमहिला विशेष
अंबा नदीच्या पात्रात उडी घेणाऱ्या विवाहित महिलेला वाचविले
नागोठणे पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

अंबा नदीच्या पात्रात उडी घेणाऱ्या विवाहित महिलेला वाचविले
नागोठणे पोलिसांची धडाकेबाज व कौतुकास्पद कामगिरी
महेश पवार
नागोठणे : दोन दिवसांपूर्वीच पूर येऊन गेलेल्या आणि सध्याही तुडुंब भरून वाहणाऱ्या नागोठण्यातील अंबा नदीच्या पात्रात उडी घेणाऱ्या विवाहित महिलेला वाचविण्यात नागोठणे पोलिसांना यश आले आहे. या मोहिमेत महत्वाची भूमिका बजावणारे पो. हे. कॉ. सुनील वाघ व पो.हे. कॉ. स्वप्नील भालेराव यांच्यासह नागोठणे पोलिस ठाण्यातील सहभागी पोलिस कर्मचाऱ्यांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नागोठण्यातील राम नगर येथील २५ वर्षीय आशा दिपक गुंजाळ या विवाहित महिलेने कौटुंबिक वाद व घरगुती भांडणातून रागाच्या भरात नागोठण्यातील जुन्या ऐतिहासिक पुलावरून अंबा नदीच्या पात्रात उडी घेतल्याची धक्कादायक घटना गुरुवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती. या घटनेची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांच्यासह पो.हे. कॉ. महेश लांगी, पो.हे. कॉ. महेश रुईकर, पो.हे. कॉ. अथर्व पाटील, वाहतूक शाखेचे महाड येथे कार्यरत असलेले मात्र नागोठण्यात राहणारे पो.हे. कॉ. सुनील चंद्रकांत वाघ, पो, ह. स्वप्नील भालेराव, पोलिस शिपाई विक्रांत बांधणकर जुन्या पुलाजवळील घटनास्थळी पोहोचले. मात्र ही महिला पाण्याच्या प्रवाहात खालील बाजूस नदीच्या पात्रात सुमारे ३०० मीटर अंतरावर वाहून गेल्याने थोडाही वेळ न घालविता सर्वजण नागोठणे उरुस सर्कल येथील नवीन पुलाजवळ पोचले. यावेळी सुनील वाघ व स्वप्नील भालेराव यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याच्या प्रवाहात उतरून पाण्यात वाहून जाणाऱ्या या महिलेला पाण्याबाहेर काढले. ही महिला जर नवीन पुलाच्या खालील बाजूस असलेल्या नदीच्या खाडी पात्रात वाहून गेली असती तर तिच्या जीवाला धोका निर्माण झाला असता.

या महिलेवर रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तद्नंतर या महिलेचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी समुपदेशन करून महिलेला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले. नागोठणे पोलिसांच्या या कामगिरीबद्दल प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी, सुनील वाघ, स्वप्नील भालेराव यांच्यासह या मोहिमेत सहभागी सर्व पोलिसांना शाबासकीची थाप मिळत आहे.




