धार्मिक सोहळामहाराष्ट्र ग्रामीणसांस्कृतिक
अंगारकी चतुर्थी निमित्त वाघ्रण ते पाली साई गणेश पालखी सोहळ्याचे जोगेश्वरी नगर येथे उत्स्फूर्त स्वागत
दिवंगत सुधाकर चितळे यांचे स्मरणार्थ अन्न प्रसादाची व्यवस्था

अंगारकी चतुर्थी निमित्त वाघ्रण ते पाली साई गणेश पालखी सोहळ्याचे जोगेश्वरी नगर येथे उत्स्फूर्त स्वागत
दिवंगत सुधाकर चितळे यांचे स्मरणार्थ अन्न प्रसादाची व्यवस्था
महेश पवार
नागोठणे : अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथून सोमवारी(दि.११) सकाळी सहा वाजता अष्टविनायक क्षेत्र पाली येथे जाण्यासाठी पायी निघालेल्या साई गणेश पालखी सोहळ्याचे नागोठण्यातील जोगेश्वरी नगर (गावठाण) येथे सोमवारी रात्री आगमन झाले. त्यावेळी स्वराज्य मित्रमंडळ व जोगेश्वरी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने पालखीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ग्रामस्थ मंडळाचे अविंद्र बामणे, रवींद्र बामणे, मंदार चितळे, केदार चितळे, अभिषेक वाळंज, श्रीकांत वाळंज, सचिन येरूनकर, अतुल बामणे, गजानन मोरवणकर, धनय बामणे, पार्थ वैशंपायन, नील खैरे, उर्मिला वैशंपायन, ऋतिका वैशंपायन, कविता बामणे आदींसह ग्रामस्थ व महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या पालखीचे हे १३ वे वर्ष असून मंगळवार दिनांक १२ ऑगस्ट रोजी असलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने वाघ्रण गावातील साई गणेश मंडळाच्या वतीने हा पायी सोहळा सोमवारी सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आला. या पायी पालखी सोहळ्यात वाघ्रण गावातील शंभरहून अधिक पुरुष सहभागी झाले असून मंगळवारी सकाळी या पालखी सोहळ्यात वाघ्रण मधील इतर नागरिक व महिलाही सहभागी झाल्या होत्या.

पहिल्या वर्षी केवळ १० ते १२ जणांनी हा पालखी सोहळा सुरू केला. पहिल्या वर्षी पालखी नागोठणे मार्गे जात असताना समाजकार्याची आवड असलेले येथील जोगेश्वरी नगर मधील एक धार्मिक व्यक्तिमत्व सुधाकर उर्फ राजू चितळे यांनी या पालखीचे स्वागत करुन दर्शन घेतले. नंतर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिकांची विचारपूस करून त्यांच्यासाठी अन्नप्रसादाची व राहण्याची व्यवस्था जोगेश्वरी नगर मध्ये श्री राम मंदिरात केली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मंदार चितळे व केदार चितळे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ अन्नप्रसादाचा हा वसा सुरू ठेवला आहे.

या पालखी सोहळ्याचे जोगेश्वरी नगर येथे रात्री ८.१५ वाजता आगमन झाल्यानंतर महिला वर्गाने व नागरिकांनी आपापल्या घरासमोर रांगोळ्या काढून पालखीचे पूजन केले. त्यानंतर पालखी जोगेश्वरी नगर मधील श्री राम मंदिरात आल्यानंतर तेथे आरती होऊन पालखीत सहभागी नागरिक व ग्रामस्थांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी वाघ्रण येथील ॲड. प्रफुल्ल पाटील यांनी साई गणेश मंडळाच्या वतीने जोगेश्वरी ग्रामस्थ मंडळ, मंदार चितळे, केदार चितळे यांचे आभार मानले. रात्रीच्या विश्रांती नंतर ही पालखी पहाटे पाच वाजता पाली कडे मार्गस्थ झाली. पाली येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात सकाळी १०.१५ वाजता पोचल्यानंतर या पालखी सोहळ्याचा समारोप झाला. या पालखी सोहळ्यासाठी स्वराज्य मित्रमंडळ जोगेश्वरी नगर आणि जोगेश्वरी नगर ग्रामस्थ व महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य मिळाले.




