कायदेविषयकगुन्हेगारी वृत्तमहाराष्ट्र ग्रामीण
अवैध धंदा भेटला तर सोडणार नाही : सपोनि सचिन कुलकर्णी
शांतताप्रिय व सुजलाम – सुफलाम नागोठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन

अवैध धंदा भेटला तर सोडणार नाही : सपोनि सचिन कुलकर्णी
शांतताप्रिय व सुजलाम – सुफलाम नागोठण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन
नागोठणे पोलिस ठाण्यातील शांतता समितीच्या सभेत महत्वपूर्ण सूचना
महेश पवार
नागोठणे : कृषी क्षेत्राची पदयुत्तर पदवी असल्याने राज्य लोकसेवा आयोगाच्या ३–४ विभागातील अधिकारी होण्याचे पर्याय माझ्यापुढे होते. मात्र देशाचे तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या कार्यकाळात दिल्लीत झालेल्या परेड मध्ये इयत्ता ९ वी मध्ये असतांना सहभागी झाल्याने मी खाकी वर्दीचे स्वप्न पाहिल्याने इतर खात्याच्या नोकऱ्या मी नाकारल्या. याच खाकी वर्दीतून समाजाला १०० टक्के योगदान देण्याचा माझा प्रयत्न असेल. त्यामुळे कुठे काही बेकायदेशीर कृत्य समजले तर कायदा हातात न घेता मला सांगा. तसेच शांतताप्रिय व सुजलाम सुफलाम नागोठण्याला गालबोट लागेल असे कुणीही करू नका हे सांगतानाच अवैध धंदे सर्वत्र बंद असताना माझ्या पोलिस ठाणे हद्दीत जर का अवैध धंदा भेटला तर त्याला सोडणार नाही असा सज्जड दम नागोठणे पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सचिन कुलकर्णी यांनी नागोठणे पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२२) सकाळी संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत दिला.

आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद सणांच्या अनुषंगाने नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील गणेशोत्सव मंडळ अध्यक्ष, शांतता कमिटी सदस्य, मोहल्ला कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, पोलीस पाटील, यांची बैठक सपोनि सचिन कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली त्यावेळी सचिन कुलकर्णी यांनी उपस्थितांना अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
१) सणाचे कालावधीत कोणत्याही प्रकारे जातीय तणाव अथवा जातीय वाद होणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी.
२) सोशल मिडियावर जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज अथवा बाहेरून येणारे मेसेज टाकू नयेत, तसे कोणी करत असेल तर त्यास वेळीच आवर घालावी व त्याची माहिती द्यावी.
३) सणाचा कालावधी असल्याने सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, रोड मध्ये अथवा गर्दीचे ठिकाणी वाहन पार्किंग करू नये
४) गणेश मंडळाने गणेश मूर्ती स्थापन होणाऱ्या मंडपात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत.
५) श्री. गणेश मूर्ती स्थापना व विसर्जन मिरवणूक या वेळेत सुरु करुन वेळेत समाप्त कराव्यात.
६) DJ सारख्या मोठ्या आवाजाचे वाद्यांचा वापर करू नये, पारंपरिक वाद्यांचा वापर करण्यात यावा.
७) सार्वजनिक मंडळाचे ठिकाणी दिवसा व रात्री असे दोन शिफ्ट मध्ये स्वयंसेवक ठेवावेत व त्यांची यादी पोलीस स्टेशन मध्ये द्यावी.
८) गणेशोत्सव मंडळाने ऑपरेशन सिंदूर – इंडियन मिलिटरी पॉवर, नशा मुक्त रायगड नशा मुक्त भारत, महिला सुरक्षा व सक्षमीकरण अशा प्रकारचे देखावे साकारावे.
९) गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई करण्यासाठी MSEB विभागाकडून अधिकृतरित्या विद्युत कनेक्शन घ्यावे.
१०) गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी महिला व मुली यांची छेडछाड होणार नाही याची सर्व गणेश मंडळांनी नोंद घ्यावी.
११) सर्व गणेश मंडळाने परवानगी करिता आपले सरकार पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक नरेश थळकर, पो. ह. स्वप्निल भालेराव, पो. ह. अथर्व पाटील यांच्यासह नागोठण्याचे माजी सरपंच विलास चौलकर, भाजप नेते सोपाभाऊ जांबेकर, उपसरपंच अकलाख पानसरे, प्रियदर्शनी संस्थेचे अध्यक्ष सिराजभाई पानसरे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते इम्रान पानसरे, गणेश घाग, प्रमोद नागोठणेकर, शांतता समिती सदस्या नंदाताई गायकवाड, निलोफर पानसरे, कांचन शेळके, निवृत्त शासकीय अधिकारी के. के. कुथे, पोलीस पाटील अदिती एकनाथ ठाकूर, महेश शिरसे, विजय पाटील, वैजयंती गदमले, वैशाली गायकर, चैत्राली झोलगे, मुजफ्फर कडवेकर, वसीम बोडेरे, संतोष कावेडिया आदी मान्यवरांसह नागरिक उपस्थित होते.

यावेळी सचिन कुलकर्णी यांनी गणेशोत्सव व ईद सणांच्या पार्श्वभूमीवर जातीय सलोखा, सोशल मिडीयाचा वापर, विसर्जन मिरवणुका याबाबतीत अनेक सूचना करतानाच रायगड पोलिसांनी सुरू केलेले “सारथी” ऍप व इ – एफआयआर याबाबतही महत्वाची माहिती दिली. उपनिरीक्षक नरेश थळकर यांनी नागोठणे ग्रामपंचायतीने गणेशोत्सवापूर्वी सर्व ठिकाणचे पथदिवे सुरू करून शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांमधील खड्डे भरून रस्ते सुस्थितीत करण्याची सूचना उपस्थित ग्रामपंचायत पद्धिकाऱ्यांना केली. याच बैठकीत विलास चौलकर, के. के. कुथे, सोपनभाऊ जांबेकर यांनीही आपले विचार व्यक्त करून आवश्यक त्या सूचना केल्या.




