
बाळसई गावाचे भोपी विठोबा मुंडे यांचे अल्पशा आजाराने निधन
बाळसई गावात हळहळ
दिनेश ठमके
नागोठणे : नागोठण्याजवळील बाळसई (ता.रोहा) गावचे भोपी म्हणून ज्यांनी गावाची अनेक वर्षे सेवा केली ते विठोबा रामजी मुंडे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी सोमवार (दि.१८) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे निधन झाल्याचे समजताच संपुर्ण बाळसई गावामध्ये शोकाकुल वातावरण पसरले. त्यांच्यावर बाळसई येथील वैकुंठ स्मशान भूमीत सोमवारीच दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास
अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्ययात्रेला विविध क्षेत्रातील नागरिक, त्यांचे नातेवाईक, मित्र परिवार व बाळसई गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत विठोबा मुंडे यांनी बाळसई गावाचे भोपी म्हणुन तसेच ग्रामदेवता श्री.बेलजाई माता व श्री.शंकराच्या मंदिरामध्ये पुजा करण्यामध्ये आपल्या आयुष्यातील बराचसा काळ घालविला. दसरा व गणपतीच्या सणांमध्ये त्यांनी सांगितलेल्या पौराणिक गोष्टी ऐकण्यासाठी तर गावातील सर्वच तरुणाई इच्छुक असायची. तसेच गावामध्ये एखादी बैठक किंवा गावकी असेल तर तर ते संपूर्ण गावामध्ये हाकाटी मारण्यामध्ये त्यांची मोलाची भुमिका असायची. त्यांना सर्वत्र भोपी बाबा या नावाने ओळखले जायचे. परंतु सर्व काही सुरळीत सुरू असतांनाच त्यांचे काही दिवसांच्या अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रिया विधी व उत्तरकार्य हे दोन्ही एकाच दिवशी रविवार ( दि.२४) रोजी राहत्या घरी बाळसई येथे होणार आहेत.




